संपूर्ण एप्रिल महिना सातत्याने आणि वेगाने वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येनं मे महिन्यामध्ये माघार घेतल्याचं दिसून येत आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात या संख्येत लक्षणीय घट आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात २४ हजार १३६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. हा आकडा देखील मोठाच असला, तरी दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत रोज आढळणाऱ्या ५० ते ६० हजार रुग्णांच्या संख्येत आता निम्म्याने झालेली घट सकारात्मक आणि दिलासादायक बाब ठरली आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याचा रिकव्हरी रेट गेल्या महिन्यातल्या ८२ टक्क्यांवरून थेट ९२.७६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आकड्यांमुळे राज्यातली आत्तापर्यंत पॉझिटिव्ह झालेल्या करोनाबाधितांची आकडेवारी ५६ लाख २६ हजार १५५ पर्यंत गेली आहे. मात्र, त्यातले फक्त ३ लाख १४ हजार ३६८ रुग्ण सध्या अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात ६०१ मृत्यू!
दरम्यान, एकीकडे करोना बाधिकांचा आकडा निम्म्यावर आलेला असताना करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा मात्र सातत्याने जास्तच राहिला आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात करोनामुळे ६०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ९० हजार ३४९ इतका झाला आहे.
पुण्यात दिवसभरात ७३९ नव्या रुग्णांची नोंद
पुणे शहरात दिवसभरात ७३९ करोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज अखेर ४ लाख ६६ हजार ८५८ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ हजार ७८ झाली. त्याच दरम्यान १ हजार ५६० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ४९ हजार ९१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
Mumbai reports 1,037 new COVID cases, 1,427 discharges, and 37 deaths in the last 24 hours
Active cases: 27,649
Total discharges: 6,55,425
Death toll: 14,708 pic.twitter.com/MTvsrnsS3r— ANI (@ANI) May 25, 2021
मुंबईत ३७ रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात १०३७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या ६ लाख ९९ हजार ९०४ वर गेली आहे. मात्र, त्याचवेळी १ हजार ४२७ रुग्णांना मंगळवारी दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ५५ हजार ४२५ इतकी झाली आहे. पण दिवसभरात झालेल्या ३७ मृत्यूंमुळे मृतांची संख्या देखील वाढून १४ हजार ७०८ इतकी झाली आहे.