गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने करोना रुग्णांची वाढ होत आहे. दिवसाला ५० ते ६० हजार नव्या रुग्णांची भर पडू लागली होती. तसेच, दिवसाला ८०० ते ९०० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिवस देखील राज्याने पाहिले. मात्र, आता या आकडेवारीमध्ये नागरिकांना आणि राज्य सरकारला दिलासा देणारे बदल होऊ लागले आहेत. गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज दिवसभरात ४२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रमाण ४५३ इतकं होतं. तसेच, गेल्या आठवड्याभरात हे प्रमाण सातत्याने ५००च्या वर राहिलं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी मृत्यूंची संख्या कमी होणं ही दिलासादायक बाब ठरली आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर!
राज्यात मृतांच्या कमी झालेल्या संख्येप्रमाणेच नव्या करोनाबाधितांची संख्या देखील दिलासा देणारी ठरली आहे. आज दिवसभरात राज्यात २१ हजार २७३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांत ६० हजारांवरून २१ हजारांवर आलं आहे. त्यासोबतच आज दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९३.०२ टक्के इतका वाढला आहे!
COVID19 | 21,273 new cases, 425 deaths and 34,370 discharges reported in Maharashtra today. The recovery rate in the state is 93.02% pic.twitter.com/PqZBl7KfAU
— ANI (@ANI) May 27, 2021
राज्यात आजघडीला एकूण ३ लाख १ हजार ०४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण करोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८० इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ९२ हजार २२५ इतका झाला आहे.
COVID19 | Mumbai reports 1,266 fresh cases, 36 deaths and 855 recoveries today; active cases 28,310. Recovery rate of Mumbai district is 94% pic.twitter.com/3kmGylpTip
— ANI (@ANI) May 27, 2021
मुंबईचा रिकव्हरी रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त!
दरम्यान, मुंबईत परिस्थिती स्थिर असल्याचं दिसून येत आहे. आजच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण १२६६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच २४ तासांत मुंबईत ३६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २८ हजार ३१० इतका झाला आहे. मात्र, मुंबईतला रिकव्हरी रेट हा अजूनही एकूण महाराष्ट्राच्या सरासरी रिकव्हरी रेटपेक्षा जास्त म्हणजे ९४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
पुण्यात ५८८ नवे रुग्ण, तर ३३ मृत्यूंची नोंद
पुणे शहरात दिवसभरात ५८८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर करोनाबाधितांची एकूण ४ लाख ६८ हजार १२९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान दिवसभरात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ हजार १४८ मृतांची संख्या झाली आहे. त्याच दरम्यान ९२१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ५१ हजार ९९१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.