Marathi News Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध घटना घडत आहेत. यामध्ये राजकीय आणि गुन्हेगारी घटनांसह पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचाही समावेश आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मराठी बोलण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल्यामुळे, त्यांच्या या भूमिकेवर उत्तर भारतातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आज महत्मा फुले यांची १९८ वी जयंती आहे. त्या निमित्ताने आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सत्ताधारी मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे हा मुद्दाही पुढे आला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी आज माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना राज्यभरात सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. यासह राज्यातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Live Updates

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ११ एप्रिल २०२५ रोजीच्या लाईव्ह अपडेट्स.

15:25 (IST) 11 Apr 2025

‘लक्ष्मीमुक्ती’ योजनेस प्रारंभ; सातबाऱ्यावर महिलांनाही संधी, पाटण तहसीलदारांचे लाभ घेण्याचे आवाहन

कराड : पाटण तालुक्यातील तुकडा नोंद रद्द अभियानाच्या यशस्वितेनंतर महसूल विभागाकडून लक्ष्मीमुक्ती योजना अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक सजातील गावनिहाय खातेदारांनी प्रत्यक्ष तलाठी कार्यालयात खातेदार पत्नीचा रहिवासी दाखला व आधारपत्रिका आणून या अभियानात नोंदणी करून घेण्याचे आवाहन पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.

पाटण तालुक्यातील महसूल विभागाने लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत महिलांना सातबारावर पुरुषांसोबत समान स्थान मिळावे, यासाठी गावोगावी शिबिर घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यातून महिलांना जमिनीवरील हक्क मिळविण्यास मदत होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे महिलांकडून स्वागत होत आहे. मंडलनिहाय सजा असणाऱ्या गावात हे अभियान राबवून अधिकाधिक महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शासनाचाच हा पुढाकार असल्याचे तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले.

15:12 (IST) 11 Apr 2025

“तहव्वूर राणाची अटक २६/११ च्या हल्ल्यामागील…”, अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया

दहशतवादी आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अटक करण्यात आल्यानंतर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामागील “खरा” सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी राणाची अटक महत्त्वाची ठरणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

14:51 (IST) 11 Apr 2025

Railways News Update : उन्हाळ्यात गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे हाल…!

एप्रिल महिन्याला १० दिवस उलटूनही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे स्थानकाच्या सर्व फलाटांवर प्रवाशांची रोजच उकाड्यामुळे हाल होत आहे. …वाचा सविस्तर
14:17 (IST) 11 Apr 2025

“मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार”, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

अमेरिकेतून भारतात आणण्यात आलेल्या दहशतवादी तहव्वूर राणाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि कट रचणाऱ्यांपैकी एक तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आल्याने मला खूप आनंद झाला आहे. यासाठी मी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानतो. कायद्यानुसार कसाबला फाशी देण्यात आली. परंतु कट रचणारा आपल्या ताब्यात नव्हता. तो आता एनआयएकडे आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आम्हाला जर काही माहिती हवी असेल ती आम्ही एनआयएकडून घेऊ आणि जर त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही ती मुंबई पोलिसांमार्फत देऊ.”

14:06 (IST) 11 Apr 2025

सांगली, मिरजेत महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

सांगली : हत्ती, घोडे, सजविलेले रथ, झांजपथक, लेझीम यांच्यासह भगवान महावीर यांचा जयघोष करत गुरुवारी सांगली, मिरज शहरात भव्य शोभायात्रा काढत महावीर जयंती साजरी करण्यात आली. या शोभायात्रेत खासदार, आमदारांसह माजी नगरसेवक, शाळकरी मुले, महिला सहभागी झाले होते.

सांगली शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत दिगंबर, डेतांबर, तेरापंथी यासह जैन धर्मातील सर्वपंथीय श्रावक, श्राविका यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शोभायात्रेनंतर मंत्रजप करण्यात आला. अमिझरा देहरासर ट्रस्ट व जैन सोशल ग्रुप यांनी कच्छी जैन भवन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५० हून अधिक जणांनी रक्तदान केले. शोभायात्रेत चित्ररथ, चांदीचे रथ यांचा समावेश होता. या भव्य शोभायात्रेत हजारो युवक, युवती, महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. यात झांजपथकासह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले होते. जैन मंदिरात सकाळपासून दुग्धाभिषेक, पूजा कार्यक्रम झाले. महावीर जयंती निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांडहोम, सावली निवारा केंद्र येथे अन्नदान, फळवाटप करण्यात आले.

14:05 (IST) 11 Apr 2025

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आंदोलन

सांगली : घरगुती गॅसच्या दरात करण्यात आलेल्या दरवाढीचा गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाकडून चुलीवर भाकरी करत निषेध करण्यात आला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत असून, याचा फटका सामान्यांच्या खिशावर पडत आहे. मोदी सरकार गो बॅकच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

सांगलीतील बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीबरोबरच गॅस दरात वाढ केल्याने याचे चटके सामान्य जनतेला बसत आहेत. वाहिनीद्वारे गॅसच्या दरातही एक रुपयाने वाढ केली आहे. एकीकडे वीज दरात कपात जाहीर करायची दुसरीकडे स्थगिती द्यायची, हे धोरण अवलंबले जात आहे. द्योगपतींना कर्जमाफी एकीकडे दिली जात असताना सामान्याच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम शासन करत असल्याचे जिल्हा उप प्रमुख शंभोराज काटकर यावेळी म्हणाले.

14:04 (IST) 11 Apr 2025

जाधव गुरूजींच्या निरूपणातून तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृद्ध – डॉ. सदानंद मोरे

कोल्हापूर : मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या गाथेचे प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणे ही सुखावणारी गोष्ट आहे. त्यांच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृद्ध केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते.

पहिला पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार स्व. तळाशीकर गुरूजी यांच्यावतीने आनंदी मारूतीराव जाधव यांनी तर, सद्गुरू डॉ. गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार आयआयटी कानपूर येथील प्रा. समीर चव्हाण यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

14:02 (IST) 11 Apr 2025

कोल्हापुरात विविध उपक्रमांनी महावीर जयंती साजरी

कोल्हापूर : अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती कोल्हापुरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. समतेची शिकवण देणारे भगवान महावीर जन्म कल्याणक जयंती निमित्त आज येथे समस्त जैन श्वेतांबर, जैन दिगंबर बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची रथयात्रा काढण्यात आली. मुनीसृवत स्वामी मंदिर लक्ष्मीपुरी येथून सुरवात झालेली रथयात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम, भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव आदींनी स्वागत केले. दिगंबर जैन बोर्डिंग येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

इचलकरंजीत प्रबोधनपर देखावे

इचलकरंजी येथे प्रभात फेरी आयोजित केली होती. दिवसभरात ध्वजारोहण, दोन ठिकाणी रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमास साहित्य वाटप, रुग्णांना दूध, बिस्कीट वाटप, मिष्ठान भोजन वाटप आदी उपक्रम करण्यात आले. सायंकाळी भगवान महावीर रथोत्सव मध्ये जैन धर्मीय विषयावर तसेच समाज प्रबोधनात्मक देखाव्याचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.

14:01 (IST) 11 Apr 2025

कोल्हापूर : जनसुरक्षा विधेयक, श्रम संहिता विरोधात लढा देण्याचा सिटूचा निर्धार

कोल्हापूर : जनसुरक्षा विधेयक आणि चार श्रम संहिता यांच्या विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन(सिटू)चे कामगार मैदानात उतरणार असल्याची घोषणा संघटनेचे राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी गुरुवारी येथे केली.सिटूचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेख बोलत होते. कामगार विरोधी व कार्पोरेटधार्जिण्या चार श्रमसंहिता रद्द करून २९ कामगार कायदे परत लागू करा, संयुक्त कृती समितीने पुकारलेला २० मे रोजीचा देशव्यापी कामगार कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी करा, अशा आशयाचे दोन ठराव संमत करण्यात आले.

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी माकपने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात एक लाख नागरिकांच्या सह्या जमा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा सचिव कॉ. सुभाष जाधव, कोषाध्यक्ष उज्ज्वला पाटील, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, विवेक गोडसे, प्रकाश कुंभार, के. नारायणन, भरमा कांबळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शिवाजी मगदूम, आभार मोहन गिरी यांनी मानले.

13:59 (IST) 11 Apr 2025

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेवारसस्थितील वाहनांना दंड, कराड वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई

कराड : कराड शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि रस्त्यावर अनेक दिवस बेवारसस्थित उभ्या असलेल्या २७ वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करून वाहनमालकांना २१ हजार ५०० रुपयांचा दंड आकाराला आहे.

कराडच्या मुख्य, तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा अनेक महिन्यांपासून काही वाहने बेवारसस्थितीत धूळखात पडून आहेत. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होवून वाहतूक कोंडीत भर पडण्यास तिथे घाणीचे साम्राज्य माजले होते. त्यावर नगरपालिका, पोलीस आणि परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी संयुक्तपणे मोहीम राबवण्याची गरज होती. मात्र, अशी संयुक्त मोहीम राबवण्यात आली नाही. मात्र, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी शहरात अशा बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधात धडक मोहीम राबवली. विविध ठिकाणच्या रस्त्यावरील उभ्या २७ वाहनांवर कारवाई करून त्यांना २१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

13:58 (IST) 11 Apr 2025

मृत मुलींच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून मदत

सोलापूर : शहरातील मोदीखाना परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या दोन्ही मृत मुलींच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बाबू झोपडपट्टीत मृत ममता उर्फ भाग्यश्री अशोक मेत्रे (वय १५) आणि जया महादेव म्हेत्रे (वय १५) यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे होते. महापालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्यानेच हे दूषित पाणी येऊन दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी पालकमंत्र्यांना भेटून केला होता. मृत मुलींच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. दोन्ही मृत मुलींना न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली. स्थानिक नागरी पायाभूत प्रश्न त्यांनी जाणून घेतले.

13:47 (IST) 11 Apr 2025

महात्मा फुले आणि महाराष्ट्राचे महानायक निळू फुले यांच्यातील नातेसंबंध आपल्याला माहिती आहे का?

निळू फुले हे महात्मा फुले यांचे थेट वंशज असल्याचे सांगतात. महात्मा फुलेंचे खापर पणतू असल्याचं त्यांनी या जुन्या मुलाखतीत सांगितले होते. …वाचा सविस्तर
13:31 (IST) 11 Apr 2025

शहर विकास आराखड्यात सुधारणेतून दीक्षाभूमीला जागा देणे शक्य, उच्च न्यायालयात ….

याचिकाकर्ते ॲड.शैलेश नारनवरे यांनी दीक्षाभूमीला कशी जागा दिली जाऊ शकते याबाबत कायदेशीर मार्ग न्यायालयात सादर केला. …सविस्तर वाचा
13:29 (IST) 11 Apr 2025

गोंदिया: जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह

मृत महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय पथका कडून वर्तविला जात आहे. …सविस्तर बातमी
13:26 (IST) 11 Apr 2025

“तहव्वूर राणाला भारत-पाकिस्तान सीमेवर फाशी देण्यात यावी”, प्रताप सरनाईक यांची मागणी

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला काल अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. याबाबत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “तहव्वुर राणाचे प्रकरण २६/११ च्या हल्ल्यावेळी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडून हाताळले जात आहे. सदानंद दाते या अधिकाऱ्यामुळे जगाला दहशतवादी हल्ल्याची अंतर्गत माहिती मिळाली. भारतातील प्रत्येकाची इच्छा आहे की, जशी कसाबला फाशी देण्यात आली, तसेच तहव्वूर राणालाही फाशी देण्यात यावी. त्याला भारत-पाकिस्तान सीमेवर फाशी देण्यात यावी जेणेकरून पाकिस्तानला भारतात असे काही करण्याचे परिणाम समजतील.”

12:34 (IST) 11 Apr 2025

जामा मशिद बाबत निर्णयाचा प्राथमिक अधिकार नाही, वक्फ न्यायाधिकरणाकडे जा, उच्च न्यायालय म्हणाले…

वक्फ अधिनियम, १९९५ नुसार या प्रकरणाबाबत निर्णयाचा प्राथमिक अधिकार वक्फ न्यायाधिकरणाकडे आहे. उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करता येणार नाही. …सविस्तर वाचा
12:21 (IST) 11 Apr 2025

खंडणी न दिल्याने दुकानदारावर वस्ताऱ्याने वार करणारा गजाआड; लष्कर भागतील घटना

याबाबत जाकिर ताजिउद्दीन कुरेशी (वय ५५, रा. व्ही. पी. स्ट्रीट, भोपळे चौक, लष्कर ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. …सविस्तर बातमी
12:04 (IST) 11 Apr 2025

“आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा”, रोहित पवारांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. अशात आता राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना लक्ष्य केले. एक्सवरील पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसत आहे. या महिन्याची १० तारीख आली तरी पगार होत नाहीत, या महिन्यात तर केवळ ५५% पगार म्हणजे २०००० पगार असेल तर केवळ ११००० पगार झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं तरी कसं? अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील, ही अपेक्षा!”

ते पुढे म्हणाले की, “सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा, ही विनंती!”

12:01 (IST) 11 Apr 2025
नागपूर ‘एम्स’मध्ये शवविच्छेदन अहवाल झाले की नाही? कळणार क्षणात.., देशातील पहिलाच प्रयोग
शवविच्छेदन अहवाल एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडून केवळ पोलिसांना उपलब्ध केले जातात. …सविस्तर वाचा
11:06 (IST) 11 Apr 2025
कोकणातील काजू बागायतदारांनी काजू बी ला मागितला हमीभाव ; मिळाले अनुदान
सिंधुदुर्ग, रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार १९६ शेतकऱ्यांना ४ कोटी ९७ लाख रुपयांचे वाटप करण्यात येत आहे. …सविस्तर बातमी
10:53 (IST) 11 Apr 2025

“भीक मागत नाही, आम्ही फक्त…” एसटी कर्मचाऱ्यंचे पगार रखडल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. अशात आता राज्याचे परिवहन मंत्री स्वत: प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याच्या सचिवाशी बोलून पगार करण्याबाबत चर्चा केली आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार जसा होतो, तसाच पगार एसटी कर्मचाऱ्यांचाही व्हायला हवा. आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही. आमचा अधिकार मागतोय.”

10:36 (IST) 11 Apr 2025

Ajit Pawar : “मी फक्त आमदार, आंदोलन करायला मोकळा”, भुजबळांच्या या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही गोष्टी…”

AJit Pawar on Chhagan Bhujbal : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी आज सकाळीच फुलेवाड्याला भेट देऊन महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महात्मा फुले यांच्या स्मारकावरून राजकीय वर्तुळात चालू असलेल्या दाव्यांबाबत अजित पवारांनी यावेळी भाष्य केलं.

सविस्तर वाचा…

10:33 (IST) 11 Apr 2025

महत्मा फुले यांना पंतप्रधान मोदींकडून अभिवादन

महत्मा फुले यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “मानवतेचे खरे सेवक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांनी समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. देशासाठी त्यांचे अमूल्य योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.”

10:23 (IST) 11 Apr 2025

Maharashtra Breaking News LIVE Updates : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे राज्यभर आंदोलन

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे.