ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजपरिवर्तनाचे काम केले म्हणूनच आज भारतात महिलांना समाजाच्या जडणघडणीत निर्णयप्रक्रियेत व सर्व क्षेत्रात पन्नास टक्के सहभाग मिळाला. सावित्रीबाई घडल्या नसत्या तर महिलांना एवढा मोढा सन्मान प्राप्त झाला नसता. परंतु आज सावित्रीबाईच्या महान कार्याचा वसा त्यांच्या लेकी समर्थपणे पुढे चालवत असल्याचे मत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८४ व्या जयंतीदिनानिमित्त व भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या समारंभात पालकमंत्री शिवतारे बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार शशिकांत शिदे, मकरंद पाटील, योगेश टिळेकर, आनंदराव पाटील, कमलताई ढोले पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, कृष्णकांत कुदळे, बापू भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्रांतअधिकारी खेबूडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नायगाव ही सावित्रीबाईची जन्मभूमी राज्यासाठी प्रेरणास्थान आहे. या गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासाठी आमचे सरकार अजिबात कमी पडणार नाही.असेही शिवतारे म्हणाले. छगन भुजबळ यांनी कर्मकांडाच्या काळात सावित्रीबाईनी समाजासाठी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे असून कर्मकांडाला झुगारून समाजसाठी फार मोठे योगदान केले आहे. आमदार मकरंद पाटील म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील सावित्रीबाई फुलेच्या जन्मगावी साडेअठरा कोटी रुपयांचा निघी खर्च करून अनेक कामे मार्गी लावण्यात येत आहेत. त्यातील साडेबारा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या गावच्या विकासात व स्मारकाच्या उभारणीत शासनाच्या माध्यमातून सर्व योजना मार्गी लावण्यात येतील. नितीन भरगुडे पाटील यांनी आभार मानले.
 
 

Story img Loader