ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्या तसेच खर्डा येथील दलित युवक नितीन आगे याच्या हत्येच्या निषेधार्थ राळेगणसिद्घी परिवाराने शुक्रवारी गाव बंद पाळून लाक्षणिक उपोषण केले. सकाळी दहा वाजता संत यादवबाबा मंदिरात सुमारे दोनशे स्त्री-पुरुषांनी लाक्षणिक उपोषणात सहभाग नोंदवला.
हजारे यांना वारंवार धमक्या येत असल्याने शासनाने अण्णांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी अलीकडेच पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आली होती. लाक्षणिक उपोषण करून बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरपंच जयसिंग मापारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेस हजारे हेही उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणासाठी उपोषण तसेच गाव बंद ठेवण्याच्या निर्णयास हजारे यांनी विरोध दर्शविला होता, परंतु ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेतल्याने ग्रामसभेच्या निर्णयास हजारे विरोध करू शकले नाहीत.
शुक्रवारी सकाळी राळेगणसिद्घीतील एकही दुकान उघडले नाही, शेतीची कामेही बंद ठेवण्यात आली होती. सकाळी दहा वाजता ग्रामस्थ संत यादवबाबा मंदिरात एकत्र झाले. संत यादवबाबांच्या समाधीचे पूजन करण्यात येऊन लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करण्यात आला. या वेळी विविध ग्रामस्थांनी हजारे यांना येत असलेल्या धमक्यांचा निषेध करून हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. सरपंच जयसिंग मापारी, उपसरपंच संपत उगले यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता हजारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मी माझे आयुष्य देश व समाजासाठी समर्पित केले असून कोणाच्याही धमक्यांना मी घाबरत नाही असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा