साताऱ्याला ‘तोत्के’ चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. गेले दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि पावसाने सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने साताऱ्यात सोमवारी सरासरी २२.५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्रभर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महाबळेश्वर पाचगणी वाई परिसरालाही या चक्रीवादळाचा फटका बसला. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून महावितरणचे लाखोंचे नुकसान झाले. मोठाली झाडं उन्मळून पडली तर, अनेक घरावरील पत्रेही उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. शिवारात उतरणीला आलेले पाडाचे आंबे, कैऱ्यांझडून खच पडला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वादळाने जिल्ह्याच्या दुष्काळी भागातही पाऊस झाला. चक्रीवादळाचा कास, बामणोलीलाही तडाखा बसला आहे.
साता-यात संततधार पाऊस सुरुच आहे. लामज तापोळ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाईला सर्वाधिक पाऊस पाऊस झाला आहे. सातारा शहरासह जावली, कराड, पाटण, कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा तालुक्यातील जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवार सायंकाळी पासून वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरु आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक महाबळेश्वर ८३.८ तापोळा ११०.९, लामज ११०.३ , पाचगणी ५५.८ (मिमी) भागात जादा पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विशेषतः कराड, पाटण, वाई, सातारा, महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात घरांची व झाडांची पडझड झाली आहे.
मागील काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. अनेक नागरिकाच्या पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती बाकी असल्याने पावसाचे आगमन होताच पावसापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.
विजेचे खांब कोसळले व झाडं उन्मळून पडली –
जिल्ह्यात बरीच झाडे ही वीज वितरणच्या तारा, खांब, ट्रान्स्फॉर्मरवर पडल्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा कास, बामणोलीलाही तडाखा बसला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. प्रतापगड येथील घरांचे छप्पर उडाले, अंगणवाडी शाळांचे इमारतींचे नुकसान, पाणी पुरवठा बंद पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे, नदीनाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, पॉलिहाऊस, संरक्षक भिंती पडणे अशा घटनांच्या मालिकांमुळे तालुक्यांतील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच ठिकाणी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही. खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीजवितरण विभागाचे कर्मचारी कसरत करत. पाचगणी आणि परिसरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी –
सातारा- १९.१० मि.मी., जावळी – ३२.०४ मि.मी. पाटण-३५.०८ मि.मी., कराड-३२.९२ मि.मी., कोरेगाव-६.११ मि.मी., खटाव-५.८१ मि.मी, माण- ०.४२ मि.मी., फलटण- ०.०० मि.मी., खंडाळा- २.४५ मि.मी., वाई – १८.१४ मि.मी., महाबळेश्वर-९४.७ याप्रमाणे आतापर्यंत एकूण २२.५३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.