आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीच्या इराद्याला धक्का देत शिवसेनेने रविवारी मध्यरात्री शहरातील तीन नाके पेटवून दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना शिवसैनिकांनी टोल नाक्याच्या केबीनच्या साहित्याची प्रचंड नासधूस केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पेटविण्यात आलेल्या टोल नाक्यांमध्ये शाहू नाका, फुलेवाडी व कसबा बावडा येथील नाक्यांचा समावेश आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला राजकीय किनार आहे का, याची चर्चा सुरू आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे ५० आंदोलक दुचाकीवरून टोल नाक्यांकडे रवाना झाले. तत्पूर्वी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना आंदोलनाची माहिती दिली होती. मात्र टोल नाके पेटविणार असल्याचे सांगण्यात आले नव्हते. नाक्यांवर आंदोलकांनी केबीन्सना लक्ष्य केले. काचा फोडून फर्निचरची नासधूस करण्यात आली. त्यानंतर या केबीन पेटवून देण्यात आल्या. प्लॅस्टिकच्या कागदाने झाकण्यात आलेल्या केबीन्सना आग लागल्यावर आगीचे व धुराचे उंच लोट दूरवरूनही दिसत होते.  शाहू नाका, फुलेवाडी व कसबा बावडा या तीन ठिकाणी पेट्रोल ओतून टोल नाक्यांच्या केबीन्स पेटवून देण्यात आल्या. केबीनचे आच्छादन व वायर आगीत जळून खाक झाल्या. घटनेची माहिती कळाल्यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.