स्थानिक व्यावसायिक वाहनधारक, खासगी वाहनधारक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी संघटितपणे आक्रमक भूमिका घेऊन रास्ता रोको आरंभल्याने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथे टोल वसुली करणाऱ्या पी.एन.जी. कंपनीने काहीशी माघार घेत २२ डिसेंबपर्यंत स्थानिक वाहनांची टोल आकारणी स्थगित केली आहे.
दहा दिवसांच्या मुदतवाढीमुळे स्थानिक वाहनधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. २० डिसेंबरनंतर आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली टोल विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. पिंपळगाव ते गोंदे या ६० कि.मी. अंतरावरील सहा पदरी रस्त्याचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असताना कंपनीने पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका कार्यान्वित केल्याचा आक्षेप स्थानिकांनी नोंदविला आहे. त्यातच स्थानिक व्यापारी वाहने, शेतकऱ्यांच्या वाहनांना टोलबाबत सवलत नाकारली होती. या पाश्र्वभूमीवर, सरपंच नंदूशेठ गांगुर्डे, उपसरपंच संजय मोरे, राहुल बनकर व व्यापारी वाहनधारकांनी टोल कंपनीच्या प्रकल्प अधिकारी वसुंधरा राव यांची भेट घेऊन सर्व प्रकारच्या स्थानिक वाहनांना टोलमधून वगळण्याची विनंती केली. परंतु, ही विनंती अमान्य करत कंपनीने स्थानिक वाहनधारकांकडून टोल आकारणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांनी टोल नाक्यावर मोर्चा काढून आपली मागणी लावून धरली. या वेळी रास्ता रोको करण्यात आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर पोलीस अधिकारी, टोल कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होऊन अखेर २२ डिसेंबपर्यंत स्थानिक वाहनांकडून टोल आकारणी न करण्याचे कंपनीने मान्य केले. ही मागणी तात्पुरत्या स्वरूपात मान्य झाल्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

Story img Loader