अशोक तुपे
भाजीपूरक आणि आहारातील बहुतांश व्यंजनांची लज्जत वाढविणाऱ्या टोमॅटोची राज्यातील लागवड एका भीषण विषाणूमुळे संकटात आली असून धोक्यात आलेली टोमॅटोची शेती वाचविण्यासाठी किमान एक वर्ष टोमॅटोची लागवड बंद करण्याचा पर्याय पुढे आला आहे. तसे झाले तर अनेक राज्यांना टोमॅटो पुरविणाऱ्या महाराष्ट्राला एक वर्ष टोमॅटो आयात करावा लागेल.
पुणे जिल्ह्य़ातील नारायणगाव, मंचर, तळेगाव, मावळ, इंदापूर भागात पूर्वी होणारी टोमॅटोची लागवड आता नगरच्या अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, सातारच्या पाडेगाव, साखरवाडी, कोरेगाव, सोलापूरचा टेंभुर्णी, करमाळा, नाशिकच्या कळवण, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत तसेच मराठवाडय़ातील लातूर, कन्नड, औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर आदी भागातही सुरु झाली आहे.
नक्की झाले काय?
लालबुंद आणि रसरशीत असलेल्या टोमॅटोच्या फळाला एका विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे त्याचा रंग, आकार बदलत आहे. फळे खड्डा पडून काढणीनंतर एकाच दिवसात सडत आहेत. त्यावर रासायनिक औषधांची फवारणी करुनही फारसा फायदा होत नसल्याचे वाराणसी येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ व्हेजिटेबल संस्थेने स्पष्ट केले. बारा वर्षांपूर्वी हा विषाणू पहिल्यांदा इटलीमध्ये सापडला.
आता तामिळनाडू, राजस्थान आणि गुजरात या राज्यात टोमॅटोला या विषाणूची बाधा झाल्याच्या तक्रारी आहेत. तीन वर्षांपासून त्याच्या तपासण्या सुरु आहेत. या विषाणूकडे गांभीर्याने बघावे लागेल. अन्यथा टोमॅटोची शेतीच धोक्यात येईल, असा इशारा बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ व्हेजिटेबलने दिला आहे.
एप्रिलमध्ये लागवड केलेल्या टोमॅटोची फळधारणा पुढील महिन्यात होणार आहे. पुणे, नाशिक व कोल्हापूर भागातील पिकावरही त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. राज्यात सुमारे दहा हजार एकर क्षेत्रातील पीक धोक्यात आले आहे- डॉ. अंकुश चोरमुले, कृषी शास्त्रज्ञ
अकोले व संगमनेरच्या सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी दोन दिवसात कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र हा विषाणू नेमका कोणता आहे हे स्पष्ट झालेले नाही. सिजेन्टा कंपनीच्या १०५७, सेमिनीजच्या आयुष्यमान तसेच बहुतांश सर्वच कंपन्यांच्या टोमॅटोवर हा विषाणू आला आहे. टोमॅटोवरती स्पॉटेड विल्टव्हायरस, तिरंगा, बोकडय़ा, पिवळा लिफकर्ल, मोझ्ॉक हे विषाणुजन्य रोग येतात. मात्र हा विषाणू वेगळ्या स्वरुपाचा आहे. त्यामुळे बंगलोर येथील प्रयोगशाळेत विषाणू तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. -डॉ. मधुकर भालेकर, कृषी शास्त्रज्ञ
स्थिती काय?
नगर जिल्ह्य़ातील अकोले व संगमनेर भागात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील टोमॅटोवर विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती संगमनेर तालुक्यातील शिवाजी लांडगे यांनी दिली. कृषी विभागातील नारायण घुले यांनी निळवंडे धरण ते आश्वीपर्यंतच्या प्रवरा नदीकाठावरील दोन्ही बाजूच्या गावात या रोगाचा टोमॅटोवर प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले. एकटय़ा नगर जिल्ह्य़ात अकोले आणि संगमनेर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावरील टोमॅटोला ही बाधा झाली आहे. तर पाडेगाव (जिल्हा सातारा) येथील अजित कोरडे यांनी सातारा व पुणे भागात हजारो एकर क्षेत्रातील पीक वाया गेले असल्याचे स्पष्ट केले.
..तर एक वर्ष शेती नाही
’टोमॅटोवर आलेला विषाणू हा जुनाच आहे. पण त्याने आपली पद्धत बदलली आहे. मोझ्ॉक विषाणूसारखाच तो आहे.
* पूर्वी टोमॅटोच्या झाडावर त्याचा प्रादुर्भाव होत असे. परंतु आता त्याच्यात काही बदल झाले असून कार्यपद्धतीही बदलली आहे.
* त्यामुळे पीकाचे नुकसान शंभर टक्के होते. त्यावर काही इलाजही सापडलेला नाही. आता एका राज्यात एक वर्षभराकरिता टोमॅटोची लागवड न करणे हा एक उपाय आहे.
* महाराष्ट्रात टोमॅटोचा अधिक प्रादुर्भाव झाला तर पूर्ण लागवड एक वर्षतरी बंद करावी लागेल, असे इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ हॉर्टिकल्चरचे शास्त्रज्ञ डॉ. एम. के.रेड्डी यांनी सांगितले.