प्रदेश काँग्रेसच्या केंद्र-राज्य संनियंत्रण समितीच्या राज्य पदाधिकारी व निवडक जिल्हाध्यक्षांच्या शिष्टमंडळासमवेत बुधवारी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. योजना समितीचा कृती आराखडा या वेळी गांधी यांना सादर केला जाणार आहे.
समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही माहिती दिली. बैठकीत समिती गेल्या दोन वर्षांचा अहवाल व आगामी वर्षांचा कृती आराखडा गांधी यांना सादर करणार आहे. पक्षाने प्रत्येक राज्यात अशा समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील समितीचे कामकाज पाहून गांधी यांनी पदाधिका-यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. याबाबत गांधी यांनी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहप्रभारी बालाराम बच्चन यांच्याशी चर्चाही केली आहे.
राज्यभरातील जनसेवकांच्या नियुक्त्या, अन्न सुरक्षा कायद्याबाबतचे जनजागरण, एफडीआयसाठी राबवलेले २५ लाख सह्यांचे निवेदन, विभागीय व जिल्हास्तरीय शिबिरे यासह या समितीबाबत राज्यातील मंत्र्यांचा निरुत्साह व अल्प प्रतिसाद याबाबीही गांधी यांच्या निदर्शनास आणल्या जाणार आहेत.
समितीने ऑक्टोबरमध्ये पुणे येथे जनसेवक परिषद आयोजित केली आहे, त्यासाठीही गांधी यांना निमंत्रण दिले जाणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader