लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी मंगळवारी येथील विशेष न्यायाधीश के. डी. बोचे यांच्यासमोर पूर्ण झाली. याबाबत उद्या गुरुवारी अडीच वाजता अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. जामीन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अटक टाळण्यासाठी माळवी यांचे प्रयत्न मंगळवारीही सुरूच राहिले. त्यांना आज मोरया इस्पितळातून हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या इस्पितळात हलविण्यात आले आहे.
१६ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तृप्ती माळवी व त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गडकरी यास अटक झाली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. गुन्हा दाखल झालेल्या दिवशी रात्र असल्यामुळे माळवी यांना तांत्रिक कारणामुळे अटक केली नव्हती. तथापि त्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढला. दुस-या दिवशी त्यांना मोरया इस्पितळात दाखल करण्यात आले. पक्षाच्या पदाधिका-यांनी इस्पितळात भेट घेऊन माळवी यांचा महापौरपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर माळवी यांचे अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू राहिले. सोमवारी त्यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रशांत देसाई यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मागितला होता. त्यांचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता.
आज सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी तपासासाठी आवश्यक असणारी शासनाची भूमिका युक्तिवादामध्ये मांडली. लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्याचा तपास अद्याप अपूर्ण आहे. महापौर तृप्ती माळवी यांच्या आवाजाच्या नोंदीची खातरजमा करणे आवश्यक आहे. तक्रारदार संतोष पाटील यांनी माळवी समर्थकांनी ठार मारण्याची धमकी दिली असल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने त्याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनाक्रम पाहता माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याऐवजी पोलिस कोठडी मिळाली. अशी मागणी अॅड. मंगसुळे यांनी केली. या संदर्भात उद्या दुपारी अडीच वाजता अंतिम निर्णय होणार आहे.

Story img Loader