जगातील पाचवे सर्वोच्च शिखर ‘माउंट मकालू’ सर करणाऱ्या गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक आशिष माने, तसेच या मोहिमेचे नेते उमेश झिरपे आणि या मोहिमेतील अन्य एक सदस्य आनंद माळी यांचा सातारकरांच्या वतीने रविवारी (दि. २९) सत्कार करण्यात येणार आहे.
रानवाटा निसर्ग – पर्यावरण संवर्धन मंडळ आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले, सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनायकराव श्रीखंडे, खासदार छत्रपती उदयनसिंहराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी सातारा नगरपालिका आणि रानवाटा संस्थेतर्फे ‘गिरिप्रेमी’च्या या गिर्यारोहकांचा मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी हे गिर्यारोहक त्यांचे अनुभव सांगणार असून त्यांच्या ‘मकालू’ मोहिमेवरील माहितीपटही या वेळी दाखविला जाणार आहे.
रविवारी (दि. २९ ) सायंकाळी ६ वाजता शाहू कला मंदिर येथे होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘रानवाटा’चे डॉ. संदीप श्रोत्री, जयंत देशपांडे, मिलिंद हळबे यांनी केले आहे.

Story img Loader