ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येत असलेल्या धमक्यांचा राळेगणसिध्दी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेध केला. दरम्यान, अशा भ्याड धमक्यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. ९) गाव बंद ठेवून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला.
हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्र्वभूमीवर राळेगणसिध्दी ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयसिंग मापारी हे होते. सुरेश पठारे, लाभेश औटी यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारे यांना वारंवार येणा-या धमक्यांचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी खर्डा येथील दलित युवकाच्या हत्येच्या अनुषंगाने हजारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला. राळेगणसिध्दी येथील उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र गायकवाड व शांताराम जाधव या दलित कार्यकर्त्यांनीही राऊत यांचा निषेध केला.
हजारे यांनी राळेगणसिध्दीतील दलितांसाठी काय केले हे मंत्री राऊत यांनी येऊन पाहावे, अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करून लोकांची दिशाभूल व समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नये. राळेगणसिध्दीत गेली ३५ वर्षे दलितांच्या बैलांना बैलपोळ्याचा मान देण्यात येतो. सामुदायिक विवाह सोहळे, दलितांच्या शेतीवरील कर्जाची सवर्णाच्या श्रमदानातून फेड असे अनेक आदर्श राळेगणसिध्दीने हजारे यांच्या नेतृत्वाखाली घालून दिले आहेत, असेही जाधव यांनी या वेळी सांगितले.