अजित घोरपडे यांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शनिवारी भारतीय जनता पक्षाने आर. आर. आबांच्या कवठय़ात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. जतच्या विलासराव जगताप यांचा भाजपातील पक्षप्रवेश लांबला असून त्यांची भाजपची उमेदवारी अनिश्चित मानली जात आहे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरुद्ध तासगाव-कवठे महांकाळ मधून राष्ट्रवादीच्या अजित घोरपडे या राष्ट्रवादीतील नेत्यांला भाजपकडून मदानात उतरवण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. घोरपडे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने कवठे महांकाळ येथे प्रचार शुभारंभ करण्यात येणार असून यासाठी गडकरी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे उपस्थित  राहणार आहेत.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आबांना कवठय़ामध्येच गुंतवून ठेवण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोहरे अडकवून ठेवण्याची रणनीती अवंलबली जाण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पहिला प्रचार मेळावा ठरावा या दृष्टीने मेळाव्याची तयारी खा. संजयकाका पाटील, आ. चंद्रकांत पाटील, प. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सहसमन्वयक मकरंद देशपांडे करीत आहेत.
दरम्यान या मेळाव्यातच जतचे विलासराव जगताप भाजपत प्रवेश करणार असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत होते. मात्र, त्यांचा पक्ष प्रवेश यावेळी टाळण्यात आला आहे. यामागे जतचे विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीचा तिढा निर्माण झाल्याने पक्षप्रवेश टाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader