दापोली / अलिबाग / नागपूर : कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह विदर्भाच्या काही भागांत गुरुवारी वादळी वाऱ्यांसह वळिवाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. पावसामुळे आंब्यासह अन्य पिके तसेच वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पंचायत समितीसमोर महाकाय वृक्ष कोसळल्याने खेड-दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तासाभराच्या प्रयत्नांनंतर ती पूर्ववत करण्यात यश आले. या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या टेलिफोन एक्सचेंजजवळ आणि शहरातील स्वरूप नगर भागातही झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शहर परिसर आणि तालुक्यात मुसळधार वादळी पावसामुळे घरे-इमारतींवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने आंबा, उन्हाळी भातपिकाबरोबरच वीट भट्टी व्यवसायाला फटका बसला. माणगाव, गोरेगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. उत्तर भागात संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा >>> यंदाचा गाळप हंगाम संपला; किती टन साखर उत्पादन?

उपराजधानी नागपूरच्या काही भागांमध्येही गुरुवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासूनच सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उन्ह, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण असा हवामानाचा खेळ सुरू आहे. गुरुवारी नागपूर शहरातील बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. अमरावती, यवतमाळ येथेही पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र ढगाळ वातावरण होते.

धाराशिवमध्ये पावसाने नुकसान

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागांत गुरुवारी दुपारनंतर कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तुळजापूर आणि भूम तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. धाराशिव शहरात दुपारी बारानंतर गडगडाट सुरू झाला. जिल्ह्यातील अति जोरदार पावसाने फळपिकांचे नुकसान झाले. जनावरांच्या चाऱ्यांच्या गंजी उडूनही अनेक ठिकाणी दाणादाण झाली. आंब्याची झाडे, बाभळीची मोठमोठी झाडे उन्मळून पडली. धाराशिव शहरातील पाटबंधारे कार्यालयासमोर चारचाकीवर मोठे झाड पडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torrential rains create a havoc in konkan and vidarbha region zws