ED Raids 10 Locations in Mumbai : मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीनं कमी कालावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री केली आहे. आज ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोरेस कंपनीने तब्बल १००० कोटींची ही फसवणूक केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये एक लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात कंपनीशी निगडीत असणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेलं असून ते कोठडीत आहेत. मुंबई आणि आसपासच्या एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचं आश्वासन या टोरेस कंपनीने दिलं होतं.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता ईडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या घोटाळ्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. आज अंमलबजावणी संचालनालयाने (२३ जानेवारी) टोरेस ज्वेलरी फसवणुकीच्या संबंधित मुंबई आणि जयपूरमधील दहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यासंदर्भातील वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिलं आहे.

कशी केली फसवणूक?

कंपनीने चार योजना आणल्या होत्या. सोन्यामध्ये गुंतवणूक करा आणि आठवड्याला दोन टक्के व्याज घ्या, चांदीत गुंतवणूक केल्यास तीन टक्के, मोझानाईट खड्यात गुंतवणूक केल्यास चार टक्के, पण केवळ मोझानाईट खड्यात गुंतवणूक केली तर पाच ते सहा टक्के व्याज अशा त्या योजना होत्या. रोख रकमेद्वारे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा (११ ते १४ टक्के) देण्याचे आमीष दाखविले जात होते. जर गुंतवणूकदारांनी आणखी गुंतवणूक आणल्यास त्यांना सरसकट २० टक्के व्याजाचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी कंपनीमार्फत परिसंवादाचेही आयोजन केले जात होते. आम्हाला सोने एकदम स्वस्तात मिळते. त्यावर ३०० टक्के नफा मिळतो. त्यामुळेच आम्ही इतके व्याज देऊ शकतो, असेही सांगितले जात होते.

गुंतवणूकदार नेमकं कसे फसले?

गुंतवणूक करणाऱ्यांना सुरुवातीला मोझानाईट खडा हा खरा हिरा म्हणून देण्यात आला. हिऱ्याची वर्षानुवर्षे पारख असलेल्या जवाहिऱ्यालाही तो खरा की खोटा हे ओळखता येत नाही. त्यासाठी यंत्राचीच गरज लागते. आपल्या पैशात हिरा मिळाल्यामुळे खुश झालेल्या ग्राहकांना दर आठवड्याला सहा टक्के दराने गुंतवणुकीवर व्याज देऊ करण्यात आले. इतकेच नव्हे तर बंपर ड्रॅाच्या नावाखाली कार, महागडे फोन भेट म्हणून देण्यात आले. त्यामुळे अर्थात ग्राहकांचा विश्वास बसला. फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या योजनेवर दहा टक्के व्याजाचे आमीष दाखविण्यात आले. ख्रिसमस आणि नवीन वर्षाची भेट म्हणून १३ टक्के व्याज देण्याचे आमीष दाखविण्यात आले.
ग्राहक भुलले आणि आतापर्यंत सव्वा लाख गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविल्याची प्राथमिक माहिती बाहेर आली आहे.

सुमारे एक हजार कोटींना या गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खरे तर गुंतवणूकदारांना व्याज मिळणे बंद झाले तेव्हा तांत्रिक अडचण असल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे गुंतवणूक फक्त रोख स्वरूपात स्वीकारली जाईल, असे सांगण्यात आले. आकर्षक व्याजापोटी गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये दिले. १ जानेवारी २०२५ पासून कंपनीने सर्व शोरुम्स बंद केली आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तौफीक रियाझ (बोगस नाव) ऊर्फ जॅान कार्टर आणि अभिषेक गुप्ता (सीए) यांनी संपूर्ण शोरुम लुटून ते फरार झाल्याचे संकेतस्थळावर घोषित केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres company scam news ed raids 10 locations in mumbai jaipur and torres jewellerys company scam fraud case in rs 1000 crore gkt