Torres Ponzi Scam in Mumbai: मुंबईत उघड झालेल्या ‘टोरेस’ कंपनी घोटाळ्यातून आता नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत. ‘टोरेस’ नावाने मुंबई, ठाणे व आसपासच्या भागात शाखा सुरू करून कंपनीनं जवळपास सव्वालाख ग्राहकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीच्या वरीष्ठ पदांवर काम करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

आठवड्याला ११ टक्के व्याजदर परतावा देण्याचं आमिष दाखवून ‘टोरेस’ नावाच्या आऊटलेट्समध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतली. आधी सोने, हिऱ्याचे दागिने विकण्यापासून सुरुवात केलेल्या या कंपनीनं गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा उभा करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात सांगितल्याप्रमाणे आठवड्याला व्याजदर परतावा दिलादेखील. पण सोमवारी अचानक कंपनीच्या सर्व शाखांना टाळं बघून गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. या शाखांच्या बाहेर हवालदिल झालेल्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सगळे पैसे घेऊन ‘टोरेस’नं पोबारा केल्याचं स्पष्ट झालं.

ना ‘टोरेस’, पण मूळ कंपनी वेगळी!

या प्रकरणात दाखल तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता ‘टोरेस’च्या मागची मूळ कंपनी वेगळीच असल्याचं समोर आलं. Hern Pvt Ltd असं या कंपनीचं नाव असून ‘टोरेस ज्वेलरी’ या नावाखाली त्यांनी तब्बल सव्वा लाख लोकांची १ हजार कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकारात कंपनीच्या तीन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक केली असली, तरी कंपनीच्या दोन संस्थापकांनी विदेशात पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोघे युक्रेनचे नागरिक आहेत. हेच दोघे या सगळ्या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जॉन कार्डर आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को अशी त्यांची नावं असून या दोघांविरोधात लुकाआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

प्रकरण आर्थिक गुन्हे तपास शाखेकडे वर्ग

या प्रकरणाची व्याप्ती पाहता हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. त्याआधी मंगळवारी शिवाजी पार्क पोलिसांनी ५२ वर्षीय जनरल मॅनेजर तानिया सॅसातोवा उर्फ तझागल कारासॅनोव्हना सॅसातोवा, ३० वर्षीय संचालक सर्वेश अशोक सुर्वे व ४४ वर्षीय स्टोअर इनचार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार यांना अटक केली आहे. तानिया ही उझबेकिस्तानची नागरिक आहे. व्हॅलेंटिना ही रशियन वंशाची असून तिनं भारतीय व्यक्तीशी विवाह केला आहे.

Video: “आठवड्याला ११ टक्के व्याज मिळणार होतं, पण…”, ‘टोरेस’नं ग्राहकांना फसवलं, पैसे गुंतवून पश्चात्ताप झाल्यानं नागरिक हवालदिल!

आधार कार्ड बनवून देणारा झाला संचालक!

या प्रकरणातली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी सर्वेश सुर्वे हा आधार कार्ड बनवून देणारं एक केंद्र चालवतो. पण त्याला कागदोपत्री ‘टोरेस’चा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. या तिघांनाही १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres fraud in mumbai thane investers duped for 1000 crores pmw