Torres Scam Update : कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस स्कॅम हा दोन युक्रेनिअन नागरिकांनी आणला होता. हा स्कॅम उघड होण्याच्या आठवड्यापूर्वीच या दोघांनी देशातून पलायन केले. गुंतवणूक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, व्हिक्टोरिया कोवालेन्को आणि ओलेना स्टॉईन हे दोन फरार युक्रेनिअन नागरिकांचा या स्कॅममध्ये हात आहे. यामुळे हजारो लहानमोठ्या गुतंवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोवालेन्को आणि स्टॉईन यांनी त्यांचे सहकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सांगितले की, ते ख्रिसमसच्या सुट्टीसाठी घरी युक्रेनला जात आहेत. पण ते सुट्टीवरून परत आलेच नाहीत. वरिष्ठ अधिकऱ्यांच्या गैरहजेरीत पगार आणि इतर देयके थकीत राहिल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. विशेषत: नवी मुंबईतील सानपाडा आणि दादर येथील दुकानांमधील गोंधळामुळे टोरेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या पॉन्झी स्कीममधील गुंतवणूकदारांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं.
याप्रकरणात टोरेसच्या संचालिका आणि उझबेकच्या नागरिक तानिया कासाटोवा आणि स्टोअर प्रभारी व्हॅलेंटिनो गणेश कुमार (रशियन) यांना अटक करण्यात आली. “आम्हाला शंका आहे की ते त्यांच्या शेअर्सच्या वाट्यावरुन भांडत होते. कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी दुकानांची तोडफोड केली”, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक शिवाजी पार्क पोलिसांशी संपर्क साधला.
रियाझ दहावी नापास
फरार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तौसिफ रियाझ हा अल्पशिक्षित होता. त्याने दहावीची परीक्षाही दिली नव्हती. भायखळा येथील आधार केंद्रावर तो ऑपरेटर म्हणून काम करायचा तर, विरार येथे राहणारा होता. त्यामुळे युक्रेनिअन लोकांनी रियाझला कंपनीचा प्रमुख म्हणून संपर्क साधला होता. रियाझनेच त्यांची ओळख सर्वेश सुर्वेशी करून दिली. सर्वेश सुर्वेची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सीईओ दिसण्याकरता घालयचा फॉर्मल कपडे
पोलिसांनी सांगितले की, रियाझला सीईओसारखे दिसण्यासाठी फॉर्मल कपडे घालण्यास सांगितले होते आणि चॅरेडसाठी पैसे देण्यात आले होते. सोमवारी अटक करण्यात आलेला सुर्वे हा केवळ कागदावर संचालक होता आणि त्याला दरमहा २५ हजार रुपये पगार होता.
“शिवाजी पार्क पोलिसांनी व्हिक्टोरियाला आरोपी घोषित केले आहे. तर मीरा रोड येथील नवघर पोलिसांनी ओलेना स्टॉईनला आरोपी केले आहे. आतापर्यंत केवळ तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या फसवणुकीच्या केंद्रस्थानी टोरेसने स्थानिक बाजारातून प्रत्येकी ३०० रुपयाला मॉइसॅनाइट दगड खरेदी केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. हे दगड मौल्यवान असल्याचं कंपनीने गुंतवणूकदारांना भासवलं होतं. “आम्ही कुलाबा येथील तानियाच्या घरातून सुमारे ५.७७ कोटी जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सहकार्य करत नाहीत आणि ते आम्हाला युक्रेनियन मुख्य आरोपीचे भाषांतरकार असल्याचे सांगत आहेत”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.