शाळेतून घरी परतणा-या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चौदा संशयितांना ताब्यात घेतले आहे. जोपर्यंत या घटनेतील आरोपींना अटक होऊन त्यांची नावे समाजापुढे येत नाहीत, तोपर्यंत गावातील एकही मुलगी शाळेत न पाठविण्याचा ठराव लोणीमावळा ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी घेतलेल्या ग्रामसभेत केला. तीन दिवसांत आरोपींचा छडा न लागल्यास रास्ता रोको करण्याचा इशाराही या ग्रामसभेत देण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या धाग्यादो-यांवरून संतोष विष्णू लोणकर (वय ३२, रा. लोणकर वस्ती, लोणीमावळा) यास ताब्यात अटक केली आहे. तृप्ती पोपट तुपे असे या दुर्दैवी शाळकरी मुलीचे नाव आहे. अळकुटी येथील श्री साईनाथ विद्यालयात दहावीच्या वर्गात ती शिकत होती. शाळेतील चाचणी परीक्षा देऊन एसटीने लोणीमावळा येथे सायंकाळी पाचच्या सुमारास पोहोचली. येथून घराकडे जाताना पाऊस सुरू झाल्याने पिंपळगांव जोगे कालव्याच्या ३७ क्रमांकाच्या चारीजवळील झाडाखाली ती आडोशाला थांबली असता तेथेच आरोपींनी तिच्यावर झडप घालून शेजारील चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिच्या तोंडात चिखल कोंबून तिचा निर्घृण खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना लक्षात आल्यानंतर पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्यासह पोलिस निरीक्षक शरद  जांभळे व त्यांच्या सहका-यांनी चारीतील तृप्ती हिचा मृतदेह बाहेर काढला. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. दरम्यान, रात्री तृप्ती हिचा मृतदेह लोणीमावळा येथून पारनेर येथे आणण्यात आला. तेथे पुन्हा पंचनामा करण्यात आला. त्या वेळी तिच्या डाव्या डोळ्याच्या वर, उजव्या भुवईवर, डोके तसेच पोटावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यामुळे तिच्यावर सुरुवातीस अत्याचार करण्यात आला व त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असावी असा संशय उपसरपंच बाळासाहेब खैरे यांनी व्यक्त केला.