सोलापुरात गेल्या १५ दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास करून १०२ नागरिक आले आहेत. त्यापैकी ७३ व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचे करोना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. परंतु उर्वरीत २९ व्यक्तींचा शोध लागत नसल्याने सोलापूर आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या २९ जणांची करोना चाचणी अद्यापही होऊ शकलेली नाही.

देशात करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तीत विषाणूचा फैलाव होत असल्यामुळे सरकारने प्रशासनाला सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून आणि देशातील विविध प्रांतांतून येणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी केली जात आहे. परदेशातून तसेच शेजारच्या कर्नाटकातून येणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. सोलापूरचा नेहमीचा संबंध असलेल्या शेजारच्या कर्नाटकासह मराठवाड्यातही ओमायक्रॉन विषाणू असलेले रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातही ओमायक्रॉन विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“परदेशातून आलेल्या ७३ प्रवाशांची करोना चाचणी निगेटीव्ह”

गेल्या १ डिसेंबरपासून यासंदर्भात विशेष मोहीम आखण्यात आली आहे. परदेशातून प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींची यादी शासनाकडून रोजच्या रोज स्थानिक प्रशासनाला पाठविली जाते. त्यानुसार आतापर्यंत सोलापुरात १०२ व्यक्ती आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्या आहेत. त्यापैकी ७३ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. परंतु उर्वरीत २९ व्यक्तींची माहिती अपुरी असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे त्यांची करोना चाचणी होऊ शकली नाही.

१८ देशांतून प्रवास करून १०२ व्यक्ती सोलापुरात

शहरात परदेशातून आलेल्या व्यक्तींमध्ये सौदी अरेबियातून आलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अमेरिका, आॕस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, इंग्लंड, ओमान, स्वीडन, बहरीन आदी विविध १८ देशांतून प्रवास करून १०२ व्यक्ती सोलापुरात आल्या आहेत.

हेही वाचा : उस्मानाबादमध्ये दोन जणांना ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग!

आरोग्य यंत्रणा सतर्क

सोलापूर महापालिका आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यावर बोलताना म्हटले, “सोलापुरात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या आणि शोध लागण्यात अडचण असलेल्या २९ व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. लवकरच या व्यक्तींचा शोध घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.”

Story img Loader