महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी नगरीत दारूबंदीचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विषारी दारूमुळे मुंबईत अनेकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच तुळजाभवानी नगरीत घेतलेला हा ठराव राज्यातील अनेक गावांसाठी पथदायी ठरेल, असा विश्वास पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तुळजापूर पालिकेची वार्षकि सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा जयश्री कंदले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात विविध ३० विषय संमत करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी नगरसेवक व नगराध्यक्षांना पत्रव्यवहार करून आवाज उठविला होता. तुळजापूरमध्ये देशी दारूची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. त्याचा परिणाम शहरावर यापूर्वीही झाला. विघातक बाबींपासून शहर दूर ठेवण्यासाठी गंगणे यांनी आवाज उठविला. त्याला शहरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सभेत बहुमताने हा ठराव संमत झाला. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विपीन िशदे यांनी पालिकेने योग्य भूमिका घेतल्याचे सांगत स्वागत केले. माजी नगराध्यक्षा अर्चना गंगणे, विद्या गंगणे, नगरसेवक अमर हंगरगेकर, पंडित जगदाळे, अॅड. मंजूश्री मगर, बाळासाहेब शिंदे, औदुंबर कदम आदी उपस्थित होते.
विलासरावांचा पुतळा उभारणार
तुळजापुरातील अग्रवाल भवन, भवानी रस्ता येथे विलासराव देशमुख यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा निर्णयही पालिकेच्या सभेत घेण्यात आला. हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण व तेथेच हा पुतळा उभारण्याचे या वेळी ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिलासाठी पाच कोटी रुपये अनुदान दिल्याबद्दल सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. संपूर्ण पालिका राष्ट्रवादीची असून काँग्रेस व इतर पक्षांचा एकही सदस्य नसताना हा ठराव झाला. विलासराव देशमुख यांनी तुळजापूरसाठी सतत आíथक मदत करून विकासाला चालना दिली. त्याची जाणीव ठेवून पालिका त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारणार आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा कंदले यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा