चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गाने भरभरून खनिज आणि वन संपत्तीची उधळण केली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूरने पर्यटन क्षेत्रात आघाडी घेतली असून त्याद्वारे जिल्ह्याच्या उत्पन्नातही भर पडत आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातही चंद्रपूर आता भरीव कामगिरी करू लागला आहे.

जंगलामुळे वाघ, बिबटे तथा अन्य वन्यजीवांच्या वास्तव्याने मानव-वन्यजीव संघर्ष असला तरी एआयच्या आधुनिक तंत्रामुळे उपाय आखले जात आहेत. बांबू संशोधन केंद्रामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून उद्योग, कारखाने, शिक्षण, आरोग्य सुविधांमुळे चंद्रपूर प्रगतीची एकेक पावले समोर टाकत आहे. सिमेंट कारखाने, पेपर मिलसोबतच महाऔष्णिक वीज केंद्र, वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या कोळसा खाणींसोबतच खासगी कंपनींच्या कोळसा खाणी, पोलाद उद्योगामुळे रोजगाराची नवी दालने निर्माण झाली आहेत.

औद्योगिक जिल्हा अशी सर्वदूर ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कृषी आणि उद्योग हा मुख्य व्यवसाय आहे. ११ हजार ४४३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा जिल्हा राज्यात चौदाव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सुमारे ४ हजार ८४२.५१ चौ.कि.मी. वन क्षेत्र आहे. याअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तिथे वाघ, बिबट आणि अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. व्याघ्र प्रकल्प व वन्यप्राण्यांच्या आकर्षणामुळे येथील पर्यटन व्यवसायाने उभारी घेतली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात विक्रमी ३ कोटी ७६ लाख ४३४ पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला आहे.

कापूस व सोयाबीन यासोबतच तूर, मूग, ज्वारी, मिरची, गहू, हरभरा ही पिकेदेखील जिल्ह्यात घेतली जातात. तांदूळ पिकाखाली ३३ टक्के क्षेत्र असून येथील तांदूळ विदेशात निर्यात केला जातो. तर उच्च प्रतीचा कापूस ३०.३ टक्के क्षेत्रावर लागवड होते. या वर्षी येथील लाल मिरची लंडन व युरोपीय देशात निर्यात केली गेली.

जिल्ह्याने सर्वच क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. पर्यटनासोबत पायाभूत सुविधा, उद्याोग, शिक्षण, आरोग्य आणि विशेष म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी जिल्ह्याला ‘बालस्नेही’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. -विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

शैक्षणिक भरारी

या जिल्ह्यात भारतातील २९ वी आणि महाराष्ट्रातील दुसरी सैनिक शाळा आहे. तळोधी बाळापूर येथे नवोदय विद्यालय, चांदा आयुध निर्माणी येथे केंद्रीय शिक्षण संस्था, १ हजार ८२९ प्राथमिक तर ६३४ माध्यमिक शाळा, २७२ उच्च माध्यमिक शाळा, १०५ महाविद्यालये आहेत. यामध्ये विद्यार्थी संख्या अनुक्रमे २ लाख ३७ हजार ५८२, ६२ हजार ९४७, ५४ हजार २६५ आणि ३८ हजार ३१७ आहे. जिल्ह्यात अभियांत्रिकी संस्था १६ आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र येथे लवकर सुरू होत असून ४१४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाचे नवीन दालन सुरू झाले आहे.

नवे उद्योग, रोजगाराची संधी

२०० पेक्षा अधिक कारखाने या जिल्ह्यात असून कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर एमआयडीसी वगळता तालुका स्तरावरील एमआयडीसीत उद्याोग नसल्याची स्थिती आहे. तरी पोंभुर्णा एमआयडीसीत नवीन जिंदाल यांचा पोलाद उद्याोग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अॅडव्हॉण्टेज चंद्रपूर २०२४ इंडस्ट्रियल एक्पो अॅण्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून १९ कंपन्यांसोबत ७५ हजार ७२१ कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. भद्रावती येथे मोठा कारखाना येऊ घातला आहे. लॉयड मेटल्स, अरविंदो, सनफ्लॅग व इतर कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे येथे आणखी रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

खनिज संपत्तीचे वरदान

खनिज संपत्तीच्या भव्य साठ्याचे वरदानच या जिल्ह्याला मिळाले आहे. लोखंड, दगडी कोळसा व चुनखडी इत्यादी खनिजाचे साठे विपुल प्रमाणात आहेत. जिल्ह्यात सध्या २९ कोळसा खाणी असून यामध्ये १७ खाणी भूगर्भावर असून १२ खाणी भूमिगत आहेत. उच्च प्रतीच्या लोहाचे साठे वैनगंगा नदीच्या पश्चिमेकडील भागात उपलब्ध आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहाची खनिज क्षमता ही राज्याच्या लोहाच्या खनिज क्षमतेच्या ७७.९ टक्के आहे. या जिल्ह्यात बॅराईर्ट्स व तांबे, क्रोमाईट्स, डोलोमाईट, फ्लोराईड याच्या खाणी आहेत.