गणपतीपुळेनंतर कोकणातील सर्वाधिक प्रसिद्ध गणेशस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवेआगर येथील सुवर्णगणेश मंदिरातून सुवर्ण मुखवटय़ाच्या चोरीच्या घटनेस शनिवारी वर्ष पूर्ण होत आहे. या स्थानाचे गेलेले वैभव अद्यापही परत आले नसून त्यामुळे दिवेआगरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वर्षभरात घट झाल्याने पर्यटनावर आधारित या गावाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कोसळणारा हा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी येथील रिसॉर्टस् आणि लॉज मालकांनी ३० ते ४० टक्क्यांनी दर कमी करण्याची खेळी खेळून पाहिली. परंतु अद्याप तरी त्यास फारसे यश आलेले नाही.
स्वच्छ व सुरक्षित सागरी किनारा, नारळ-सुपारीच्या बागा आणि जोडीला सुवर्णगणेश मंदिरामुळे आलेले धार्मिक महत्त्व, या सर्वाचा परिपाक म्हणून दिवेआगरला पर्यटकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत होता. कोकण पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची दिवेआगरला भेट आणि मुक्काम ठरलेला असे. मुंबई व पुण्याचे अनेक पर्यटक तर प्रत्येक शनिवार-रविवार दिवेआगरला मुक्कामी थांबत असत, अशी माहिती नाशिक येथील कोकण पर्यटन विकास संस्थेचे संचालक दत्ता भालेराव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. वर्षांपूर्वी सुवर्णगणेश मंदिरातील गणेशाच्या सुवर्ण मुखवटय़ाची चोरी झाली. चोरटय़ांच्या हल्ल्यात दोन पहारेकऱ्यांचाही बळी गेला. पोलिसांनी महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या सुवर्ण मुखवटय़ाचा वितळविलेला गोळा व संशयितांना पकडण्यात यश मिळविले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत पुढील निर्णय घेणे मंदिराच्या विश्वस्तांनाही शक्य नाही.
सुवर्ण मुखवटय़ाच्या चोरीमुळे पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे अ‍ॅम्बियन्स कॉटेजचे संचालक लालाभाई पटवर्धन यांनी मान्य केले. याआधी दिवेआगरला वर्षभर पर्यटकांची गर्दी राहात असे. लॉजेस्, कॉटेजेस्मध्ये निवासासाठी खोली मिळणे मुश्किल होत असे. परंतु मुखवटय़ाच्या चोरीनंतर पर्यटनाशी संबंधित व्यवसायांवर परिणाम झाला. संपूर्ण वर्षभरात २६ जानेवारीला जोडून आलेल्या तीन सुटय़ांचा अपवादवगळता कॉटेज कधीही फुल्ल झाले नाही, असे पटवर्धन यांनी ‘लोकसत्ता’कडे नमूद केले. पर्यटकांची गर्दी कमी होण्यामागे मंदी हेही एक कारण असून हॉटेल, लॉज व कॉटेजमध्ये किराणा माल व भाजीपाला पुरविणाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. पर्यटकांनी निवासासाठी दिवेआगरला पुन्हा पसंती द्यावी म्हणून काहींनी दर कमी केल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिराचे याआधीचे विश्वस्त प्रदीप सहस्त्रबुद्धे यांनी मात्र पर्यटकांची संख्या कमी होण्याची झळ बडय़ा हॉटेल व लॉजेस्ना अधिक बसली असल्याचे नमूद केले. घरगुती स्वरूपातील निवास व न्याहरी व्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नसल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. कोकण पर्यटनात आता दिवेआगरला पसंती देणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे नमूद करीत दत्ता भालेराव यांनी, न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा मंदिराचे वैभव जैसे थे होण्यासाठी ग्रामस्थ व विश्वस्तांनी प्रयत्न केल्यास पुन्हा दिवेआगर वर्षभर पर्यटकांनी गजबजू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.