सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिकची प्रसिध्दी करण्यासाठीे मार्च २०१५ मध्ये येथे पर्यटन परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली. चेंबरच्या महिला विभागातर्फे शुक्रवारी आयोजित ‘प्रेरणा २०१५’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आ. छगन भुजबळ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी महिलांमध्ये उद्योजकतेचा गुण उपजतच असल्याने त्यांना मार्ग दाखविण्याचे काम आपण केल्यास त्यांची अधिक प्रगती होईल, असा आशावाद व्यक्त केला.
उद्योग व्यापाराबरोबरच, राजकारण, समाजकारण आणि विविध क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करताना  दिसतात. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांची प्रगती अपेक्षित आहे. नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याप्रसंगी महिलांनी असे वस्तू विक्री कक्ष उभारल्यास मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले. आ. देवयानी फरांदे यांनी अशा उपक्रमांना शासनाकडून सर्वेतोपरी मदतीचे आश्वासन दिले. चेंबरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी राज्यातील विद्युत तुटवडय़ावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सौर वीज पंप देण्याची चेंबरची योजना शासनाने मान्य केली असून, त्यावर लवकरच कार्यवाही होईल अशी माहिती दिली. प्रारंभी चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्षा डॉ. धनश्री हरदास यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. महिला उपसमितीच्या सुनिता फाल्गुने यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. प्रज्ञा पाटील यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा