सावंतवाडी नगर परिषद पर्यटन महोत्सव २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी २२ ते २४ डिसेंबर कालावधीत स्थानिक लोककला कार्यक्रम होतील, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवाला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व गृहमंत्री आर. आर. पाटील यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
नगर परिषद लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी ही माहिती दिली. पर्यटन महोत्सव २६ ते ३० डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीसाठी नामवंत कलाकारांना निमंत्रित करून विविध कार्यक्रम केले जातील. शिवाय फुड फेस्टिवल, मालवणी वडा-सागोती, गोवन फिश कढी अशा विविध स्टॉल्सना प्राधान्य दिले जाणार आहे, असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी स्पष्ट केले.
येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत लोकल कार्यक्रमाचे नियोजन, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, मोती तलावात तरंगता तराफा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय छायाचित्रकार अनिल भिसे यांच्या नजरेतील छायाचित्र प्रदर्शन पर्यटन स्वागत कक्षात आयोजित केले आहे, असे साळगावकर म्हणाले.
या महोत्सवात ७६ स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्यातील १५ बाय १० चे २९ स्टॉल्स असतील. त्यात दहा स्टॉल्स फुड स्टॉलचे असतील. स्टॉल बुकिंग ५ डिसेंबरपासून सुरू होत असून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन साळगावकर यांनी केले. कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन, प्रॉडक्ट व संशोधन अवजारांचे खास प्रदर्शन या ठिकाणी असेल. महिला बचत गट व अपंगांच्या उत्पादनांना प्राधान्य देण्यात आल्याचे बबन साळगावकर यांनी सांगितले. डी. के. टुरिझम या संस्थेने खास पर्यटन सहल आणण्याचे मान्य केले आहे, असे ते म्हणाले.
पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी १६ समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात समन्वय समिती, सांस्कृतिक समिती, स्टॉल समिती, कायदेविषयक समिती, प्रायोजक व प्रसिद्धी समिती, स्टेज, निवास व भोजन, विद्युत रोषणाई, बैठक व्यवस्था, टूर्स, शोभायात्रा, स्वच्छता, सुरक्षा, सत्कार, पाककला व स्थानिक लोककला कार्यक्रम समिती स्थापन करून सर्वाना समितीत प्राधान्य देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
सावंतवाडी नगर परिषद पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वानी नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.