रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी आणि महिला बचत गटांच्या उत्पन्न वाढीसाठी केरळ राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत चार आधुनिक पर्यटन बस तसेच पाच हाऊसबोट विकत घेतल्या आहेत. यातील काही पर्यटन बस रत्नागिरीत दाखल झाल्या असून हाऊसबोट येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहेत. पर्यटन बस आणि हाऊसबोट याचा लोकार्पण सोहळा लवकरच होवून त्यांची सेवा सुरु होणार आहे. या सर्व पर्यटन बस आणि हाऊस बोट जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> Sanjay Raut : “ज्या दिवशी सत्ता जाईल, त्या दिवशी…”, खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
रत्नागिरी जिल्हा परिषदेने केरळ राज्याप्रमाणे हाऊस बोटिंग आणि पर्यटन बसचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सिंधुरत्न योजनेतून या प्रकल्पाला निधी मंजूर झाला असून या प्रकल्पासाठी चार पर्यटन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. ही बस सतरा आसनी असणार आहे . साधारण अठ्ठावीस लाख रुपये किंमतीच्या या बसमध्ये एसी, चाजींग पॉइंडसर करमणुकीची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी ही बस फिरवण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> सातारा : विरोधात काम केल्यास निवडणुकीनंतर ‘लाडकी बहीण’मधून नावे वगळणार; आमदार महेश शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य
सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या या बसपेकी रत्नागिरी तालुक्यासाठी २, संगमेश्वर तालुक्यासाठी १ आणि दापोली तालुक्याला १ बस दिली जाणार आहे. जिल्ह्यात राबवण्यात येणारा बोटीचा प्रकल्प ५ कोटींचा असून प्रत्येकी एक बोट एक कोटीची आहे. यासाठी एकूण ५ बोटी खरेदी करण्यात आल्या असून त्यामध्ये २ बेडरुम, एसी, नाष्ता, जेवण आदींची सुविधा उपलब्ध असणार आहे. या बोटींसाठी जयगड ते दाभोळ या खाडीमार्गाची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्या परिषदेकडून राबविण्यात येणा-या या प्रकल्पांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कीर्तिकीरण पूजार यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद आवारात यातील ४ पर्यटन बस दाखल झाल्या आहेत. येत्या २१ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येत असलेले हे दोन्ही प्रकल्प महिला बचत गटांच्या प्रभाग संघाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. महिला बचत गटाच्या महिलांना स्वावलंबी बनविणे हा ऊद्देश या प्रकल्याचा असणार आहे.