सातारा : नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेले आहे. पुढील आठवडाभरासाठी महाबळेश्वर, पाचगणीसह परिसरातील सर्व लॉज, हॉटेल, खासगी बंगले, रिसॉर्ट, शेतघरे, पर्यटक निवास ‘हाऊसफुल’ झाले आहेत. नाताळपासून वाढू लागलेल्या या पर्यटकांच्या संख्येने आता गर्दीचे रूप धारण केले आहे. महाबळेश्वरमधील विविध पॉइंट, वेण्णा लेक, धार्मिक-ऐतिहासिक स्थळांसह, बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे. दरम्यान वाढत्या गर्दीने महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे शनिवारी पाहण्यास मिळाले.
नाताळ साजरा करण्यासह नववर्ष स्वागतासाठी या थंड हवेच्या पर्यटनस्थळाला पर्यटकांची पसंती असते. एक-दोन महिने आधीच हॉटेल, लॉजसह बंगले आरक्षित केले जातात. हॉटेल व्यावसायिकांसह बाजारपेठेतील व्यापारीवर्ग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारच्या क्लृप्त्या लढवताना दिसताे. कुठे आकर्षक फुलांची सजावट, तर कुठे रोषणाई केली जाते. अनेक रिसॉर्टवर नाताळ व नववर्षाचे औचित्य साधत विविध थीम, विविध गेमची धूम असते.
हेही वाचा >>> सांगली : अटकेची भीती घालत वृध्द सेवानिवृत्तांना गंडा
नाताळ या ख्रिश्चनधर्मीयांच्या सणानिमित्त येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अनेक रिसॉर्टवर नाताळबाबाची प्रतिकृती, तसेच ख्रिसमस ट्रीदेखील आकर्षकरीत्या सजवले आहेत. नाताळ आणि नव्या वर्षाचे स्वागत जोडून येत असल्याने या काळात महाबळेश्वरमधील पर्यटकांची गर्दी कायम उच्चांकी पातळीवर असते. यंदाही ती मोठ्या प्रमाणात आहे.
महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णा लेक परिसरात नौकाविहारासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. वेण्णा लेकसह येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळीदेखील पर्यटक दिसत आहेत. थंडी, धुंद आल्हाददायक वातावरण अन् महाबळेश्वरी पदार्थांची चव चाखण्यास पर्यटक सध्या हातगाड्यांपासून मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. लालचुटूक, आंबटगोड स्ट्रॉबेरीची चव चाखताना, तसेच गाजर-मुळा-गरमागरम मक्याच्या कणसावर ताव मारतानाही पर्यटक पाहावयास मिळत आहेत.
हेही वाचा >>> “…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत सायंकाळी स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून पर्यटक फेरफटका मारत आहेत. थंड वातावरणात अनेक खवय्ये पर्यटक हे स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आईसगोळा अशा थंड पदार्थांसोबत गरमागरम मका पॅटिस, स्प्रिंग पोटॅटो, शॉरमासारख्या पदार्थांवरदेखील तुटून पडत आहेत. शालेय सहलींमुळे विद्यार्थ्यांचीदेखील गर्दी पाहावयास मिळत आहे. दिवसभर प्रेक्षणीय स्थळे फिरून सायंकाळी खरेदीसाठी आल्यामुळे बाजारातील रेलचेल वाढली आहे. पाचगणी, महाबळेश्वरमधील हॉटेल, लॉज, रिसॉर्टबरोबर वाई तालुक्यातील फार्म हाऊसला मोठी मागणी आहे. त्यामुळे येथे आत्तापासून आरक्षण व खाद्यपदार्थांची मागणी नोंदविली जात आहे. पर्यटनस्थळाबरोबर वाईचा महागणपती व मांढरदेव काळूबाई येथेही भक्तांची गर्दी या सुटीच्या अनुषंगाने वाढली आहे.
दरम्यान वाढत्या गर्दीने महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे शनिवारी पाहण्यास मिळाले. अरुंद रस्ता असलेल्या भागात वाहतुकीची कोंडीही होत असल्याचे दिसत आहे.
यंदा निवडणुकांमुळे उन्हाळी आणि दिवाळीचा सुटीचा हंगाम पर्यटकांची वाट पाहणारा गेला. मात्र, या पार्श्वभूमीवर नाताळाची सलग सुटी आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल, लॉज यांच्यासह पर्यटनाशी निगडित सर्वच व्यवसायांना याचा मोठा फायदा होईल.
– अतुल सलागरे, व्यावसायिक, महाबळेश्वरगुलाबी थंडी, स्वच्छ सूर्यप्रकाश, हिरवागार निसर्ग, मस्त हवा यामुळे एकूणच महाबळेश्वरचे वातावरण आल्हाददायक आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे. अनेक भागांतून आलेल्या पर्यटकांमुळे महाबळेश्वर असे फुलून गेलेले आहे. आम्ही बारा जण मुंबईहून आलो आहोत, सर्वजण येथील पर्यटनाने आनंदी आहोत. सर्वजण खूप मजा अनुभवत आहेत. – निकिता सवानी, पर्यटक, मुंबई</p>