नाताळ आणि सलग सुट्टय़ांमुळे गर्दी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाताळ आणि सलग सुट्टय़ांमुळे शनिवारी महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी फुलून गेले. शनिवारी या स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. तर पर्यटन स्थळांवरही मोठी गर्दी होती. दरम्यान, येत्या काही दिवसांत येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सलग सुट्टय़ांमुळे महाबळेश्वर पाचगणी येथे पर्यटक आजच मोठय़ा संख्यने दाखल झाले आहेत. पुण्या-मुंबईपासून कमीतकमी अंतर आणि लागणारा वेळ विचारात घेऊन अनेक जण आजही महाबळेश्वरला पसंती देतात. यंदा नाताळ सणाला जोडून शनिवार, रविवारची सुट्टी आल्याने सलग ३ दिवस पर्यटकांना मिळत असल्याने आज सकाळपासून मोठय़ा संख्येने पर्यटक इकडे येऊ लागले आहेत. शनिवारी या स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. तर पर्यटन स्थळांवरही मोठी गर्दी होती. आलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्राबरोबर गुजरात आंध्र प्रदेश, बेळगावसह कर्नाटकातील पर्यटकांचाही समावेश आहे.  सध्या शहरातील सर्व हॉटेल-लॉजवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आगाऊ नोंदणी केल्यामुळे बहुतेकांकडील पर्यटकांची सुविधा ही शंभर टक्के भरली असून भाडय़ांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यंदा नाताळ ते नववर्षांरंभापर्यंत वेण्णा लेक येथील नौकाविहाराची वेळ वाढविण्यात आली असल्याचे असे नगराध्यक्षा स्वप्नाली िशदे यांनी सांगितले. त्यामुळे येथील चौपाटीही उशिरापर्यत सुरू राहणार आहे.

पुस्तकांच्या गावाचे आकर्षण

महाबळेश्वर सहलीमध्ये अनेकांसाठी यंदा ‘पुस्तकाचे गाव’ भिलार पाहण्याचे आकर्षण आहे. वाई, पाचगणी, महाबळेश्वर रस्त्यावर स्ट्रॉबेरीचे अनेक छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. लालचुटूक स्ट्रॉबेरीची चव चाखण्याचा आनंदही पर्यटकांना घेता येणार आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल

महाबळेश्वर रस्त्यावरील अरुंद रस्ते, पूल व नाताळ आणि नववर्षांनिमित्त होणारी पर्यटकांची व वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चार जानेवारीपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी काही मार्गावर एकेरी वाहतूक सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत राहणार आहे. जड वाहनांमुळे आर्थरसीट पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर मार्गावर होणारी वाहतूककोंडी टाळण्याचा प्रयत्न राहणार असून, काही मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.

दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक, महाबळेश्वर

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist in mahabalesh christmas celebration