उस्मानाबाद येथे मागील दहा दिवसात झालेल्या पावसासह परतीच्या पावसानेही नळदुर्ग परिसरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक धबधबे सुरु झाले आहेत. उस्मानाबाद, लातूरसह सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नळदुर्ग किल्ल्यात यंदा करोनामुळे पर्यटक नाहीत. त्यामुळे अनलॉक-5 मधील पर्यटनाबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
अतिवृष्टीमुळे नळदुर्ग येथील बोरी धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून सांडवा सुरू झाला आहे. याचा परिणाम म्हणून नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले प्रेक्षणीय व नेत्रदीपक नर-मादी व शिलक हे दोन्ही धबधबे आज (मंगळवार) वाहण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र सध्या करोनामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला १५ मार्चपासून पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना हे दोन्ही धबधबे वाहताना पाहता येणार नाहीत. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहताना पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. अतिशय नेत्रदीपक व प्रेक्षणीय धबधबा म्हणून नर-मादी धबधब्याची ओळख आहे. या धबधब्यामुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिकच वाढले आहे.
किल्ल्यातील नर-मादी व शिलक हे दोन्ही धबधबे वाहण्याची शक्यता फार कमी वाटत होती. कारण पावसाळा संपत आला तरी या भागात पाऊसच नव्हता. त्यामुळे बोरी धारण व बोरी नदीत अतिशय कमी पाणीसाठा होता. मात्र पुन्हा एकदा परतीचा पाऊसच मदतीला धाऊन आला आणि अवघ्या दहा ते बारा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे बोरी धरण १०० टक्के भरून धरणाचा सांडवा सुरू झाला. या सांडव्यामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि पर्यटकांच्या आवडीचे दोन्ही धबधबे सुरू झाले आहेत.