रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावर अर्धवट सुरु असलेल्या कामांचा फटका जिल्ह्यात येणा-या पर्यटकांना चांगलाच बसला आहे. महामार्गावरील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वहातूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटकांना नाहक भूरदंड सहन  करावा लागत आहे. तसेच ही वाहतुक कोंडी सोडविताना पोलिसांना तारेवरची  कसरत करावी लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी जिल्ह्यात नाताळची सुट्टी आणि वर्षाअखेर असल्याने मुंबई , पुणे यासारख्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकण आणि गोव्याकडे येत आहेत. मात्र जिल्ह्यातील महामार्गाच्या पुलांची अर्धवट सुरु असलेली कामे आणि रखडलेले चौपदरीकरणाचे काम यामुळे  महामार्गावरील संगमेश्वर शहर  बावनदी, निवळी, हातखंबा, पाली आणि रत्नागिरी शहर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहन चालक, प्रवासी यांना याठिकाणाहून जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा >>> वाल्मिक कराड शरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हे षडयंत्र कुणाचं आहे? कोणती मोठी ताकद…”

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील  सोनवी नाक्यात वाहतूक कोंडी झाल्याने अवजड वाहने याठिकाणी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. संगमेश्वर येथील सोनवी, बावनदी,पाली तसेच लांजा शहर याठिकाणी पुलांची कामे सुरु आहेत. मात्र मंदावलेल्या  कामांचा फटका पर्यटकांना बसू लागला आहे. नागपुर रत्नागिरी महामार्गाचे देखील काम सुरु असल्याने येथील कामांचा कोल्हापूर, देवरुखकडे जाणा-या वाहनांनाही येथे होत असलेल्या कोंडीचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>> Bajrang Sonavane : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर बजरंग सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया, “सीआयडीने आता…”

गेले अनेक दिवस वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाला असताना महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे. महामार्गावरील  अवजड वाहनांमुळे काही परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर धुळीमुळे वाहने चालवताना जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागत आहे. महामार्गावरील अर्धवट सुरु असलेल्या या कामांचा फटका पर्यटकांना  बसत असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists suffer over traffic congestion on mumbai goa highway traffic zws