लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : कास पठारावर जाण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करत त्यांची नोंद आणि त्यानुसार पैसे घेत पर्यटकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या १३ जणांच्या पथकाची अशी फसवणूक झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे.

जागतिक वारसास्थळ कास पठाराच्या नावाचे दुसरे एक बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचे समोर आले असून, यातून पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

आणखी वाचा-पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. त्यासाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. मात्र याचवेळी पर्यटकांची लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील १३ पर्यटकांनी फुले पाहायला येण्यासाठी रविवारी (दि. २२) ऑनलाइन आरक्षण केले होते. हे आरक्षण बुधवारी (दि.१८) केले होते. त्याकरिता त्यांनी प्रति पर्यटक १५० रुपये प्रमाणे १९५० रुपये प्रवेश शुल्क देखील आकारले होते. तशी त्यांच्याकडे पावती देखील होती. मात्र त्यांनी आरक्षण केलेले संकेतस्थळ अधिकृत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

पुण्याच्या या पर्यटकांनी दाखवलेली पावती कास पठार कार्यकारी समितीच्या कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी पाहिली असता त्यावर अधिकृत संकेतस्थळऐवजी kas.cca@icici असा उल्लेख असल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित पर्यटकांना हे संकेतस्थळ अधिकृत नसून आपली दिशाभूल झाली असल्याचे सांगण्यात आले. कास पुष्प पठाराची अधिकृत वेबसाईट ही http://www.kas.ind.in ही असून पुष्प पठार सुरू झाल्यापासून हंगाम कालावधीमध्ये याच अधिकृत संकेतस्थळावर कास पुष्प पठारासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असते. तसेच याच संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन आरक्षण देश – विदेशातून तसेच राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. बनावट संकेतस्थळाद्वारे किती जणांची फसवणूक झाली आहे हे अद्याप समजलेले नाही.

आणखी वाचा-पंढरपुरातील धनगर उपोषण स्थगित; आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

ज्यांनी चुकीचे संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची फसवणूक केली आहे, अशा समाजकंटकांवर सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्यावतीने लवकरच कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे कास पठार कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे.

अधिकृत संकेतस्थळाचा आधार घ्या

ज्या पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग करायचे आहे त्यांनी http://www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळाचा आधार घ्यावा. त्यावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून नंतरच ऑनलाइन नोंद करण्यात यावी. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही व कासच्या नावाखाली लुबाडणूक होणार नाही, असे आवाहन कास पठार कार्यकारी समितीने केले आहे.