सांगली : यंदाच्या हंगामात पाऊसकाळ बक्कळ, पडंल तिथं सोनं पिकंल, शेळ्या-मेंढ्या राखंल तो सुखी हुईल, असे भाकीत कृष्णाकाठच्या आमणापूरनजीक बंचाप्पा बनात गुढीपाडव्यादिवशी वर्तवण्यात आले. आसपासच्या पाच गावांतील जमलेल्या धनगरी ढोल-कैताळच्या निनादात हे भाकीत सालाबादप्रमाणे वर्तवण्यात आले.

पलूस तालुक्यातील बुर्ली -आमणापूर-कृष्णाकाठावर बंचाप्पा बन हे सुमारे ऐंशी एकराचे गायरान आहे. याठिकाणी असणाऱ्या बंचाप्पा मंदिरात चैत्र पाडव्याच्या निमित्त हजारो भाविक व भक्तांच्या उपस्थितीत काल भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी बुर्ली, आमणापूर, पलूस, रामानंदनगर, येळावी या पाच गावांतील धनगर समाज ध्वज, कैताळ, ढोल घेऊन उपस्थित राहिले. यावेळी आसमंत निनादणाऱ्या वालूक वादनाचा कार्यक्रम केला.

भंडाऱ्याची उधळण करत बंचाप्पा, मायाप्पाच्या नावे चांगभलंच्या घोषणा देत विधी पार पडला. यामध्ये सुनील खोत सिद्धेवाडी, शिवाजी पाटील बुर्ली यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले. यावेळी वर्तवण्यात आलेल्या भाकणुकीमध्ये पाऊसकाळ बक्कळ राहील, पडंल तिकडं सोनं पिकंल, शेळी-मेंडी राखंल तो सुखी होईल असे सांगण्यात आले.

गुढीपाडवा आणि दसऱ्याला बंचाप्पा त्याचा भाऊ मायाप्पाला भेटायला जातो, अशी आख्यायिका आहे. यानिमित्त बुर्ली येथून बंचाप्पाची पालखी काढून ती वाद्यांच्या गजरात किर्लोस्करवाडी कारखाना परिसरात असलेल्या मायाप्पा मंदिरात नेली जाते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात.