वाई पाचगणी महाबळेश्वरला वाहतूक आणि व्यवसाय ठप्प

वाई:राज्यपाल रमेश बैस यांच्या दौऱ्यात सुरक्षेच्या कारणास्तव वाई महाबळेश्वर मार्ग आणि या मार्गावरील वाहतूक व व्यवसाय पाच तास बंद ठेवण्यात आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे महाबळेश्वरला येऊनही वाहतूक कोंडीत अडकल्याने पर्यटक उद्विग्न झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यपाल रमेश बैस यांचे चार दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आगमन झाले. सकाळी अकरा वाजता राज्यपाल वाई येथील हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या बेल एअर हॉस्पिटल ला भेट दिली. राज्यपाल या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. यानंतर राज्यपाल पाचगणी मार्गे भिलारला गेले. तेथून ते महाबळेश्वरला राजभवनावर गेले .

या सर्व मार्गावर आज सकाळ पासून पाच तास वाहतूक बंद राहिली.या मार्गावरील व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले होते. महाबळेश्वर वाईमार्ग बंद असल्यामुळे पर्यटक महाबळेश्वर येथेच अडकून पडले. त्यांना मेढा सातारा मार्गे सोडण्यात आले. राज्यपाल येणार असल्याने वाई येथूनच सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती .त्यामुळे वाहनांच्या वाई शहरासह पुणे बंगळूर महामार्गावरील सुरूर पाचवड पर्यंत रांगा लागल्या होत्या. वाई शहरातील मुख्य मार्गही वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते. राज्यपाल जाणार असलेल्या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यवहार बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे पाचगणी मेटगुताड येथील माप्रो सेंटर या मार्गावर बसणारे स्ट्रॉबेरी रासबेरी विक्रेते स्थानिक व्यावसायिक यांनाही विक्रीसाठी बसण्यापासून रोखण्यात आले होते.

याशिवाय महाबळेश्वर येथील वेण्णा लेक वरील बोटिंग, घोडे सवारी छोटे-मोठे व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. राज्यपाल बारा वाजता पाचगणीकडे रवाना झाल्यावर वाई सुरूर रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली. पाचगणी महाबळेश्वर मार्गही बंद ठेवण्यात आला होता. भिलार भोसे खिंड येथून महाबळेश्वर मार्गावरील सर्व व्यवसाय पर्यटकांची अवजावक प्रभावीत झाली होती. दरवर्षी मे महिण्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते व्यवसाय ठप्प झाल्याने व पाचगणी महाबळेश्वर येथे येऊनही वाहतूक कोंडीत अडकल्याने स्थानिक व्यवसायिकांनी व पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic and businesses on this route were affected for five hours due to security reasons due to the governor visit amy