धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी धनगर समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने सोलापुरात ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. पुणे रस्त्यावर बाळे येथे झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती.
धनगर समाजाचे नेते तथा काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकते, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, नगरसेवक चेतन नरोटे, शिवाजी पिसे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक राजगे आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, शेकापचे नेते, आमदार गणपतराव देशमुख यांचे पुत्र तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
आंदोलनाच्या अगोदर चार हुतात्मा चौकात धनगर बांधव एकत्र आले. पिवळे फेटे व शेले बांधलेले आणि माथ्यावर पिवळा भंडारा लावलेले हजारो कार्यकर्ते घोषणा देत शक्तिप्रदर्शन करीत होते. तेथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांच्या पुतळय़ास व चार हुतात्म्यांच्या पुतळय़ांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आंदोलकांचा जमाव पुणे रस्त्यावर बाळे येथे गेला.
बाळे येथील चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू झाल्यानंतर पुणे-सोलापूर-पुणे तसेच बार्शी व हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. रस्त्यावर दोन्ही बाजूला हजारो वाहने थांबून होती. सुमारे दोन तास हे आंदोलन चालले. विशेषत: एसटी प्रवाशांचे हाल झाले. या वेळी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात होता. परंतु आंदोलनात हस्तक्षेप करणे पोलिसांना अशक्य झाले.
 

Story img Loader