अलिबाग- मुंबई गोवा महामार्गावर माणगाव ते इंदापूर दरम्यान रविवारी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात जाणारे आणि कोकणातून येणारे प्रवासी तासंतास अडकून पडले होते. माणगाव ते इंदापूर हे अंतरपार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते.
शिमगोत्सव साजरा करून हजारो चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न येऊ नये यासाठी रविवारी महामार्गावर कशेडी ते खारपाडा दरम्यान अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र तरिही वाहनांची संख्या वाढल्याने, माणगाव ते इंदापूर परिसरात वाहनांच्या आठ ते दहा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी प्रवाश्यांना दीड ते दोन तास लागत होते. पोलीसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र बेशिस्त वाहन चालक लेनची शिस्त पाळत नसल्याने, वाहतूकीचे नियमन करणे कठीण जात होते.
दोन्ही बाजूला वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बाह्य वळण रस्त्याची कामे सध्या रखडली आहेत. त्यामुळे अरुंद रस्त्यातून मार्गक्रमण करत या दोन्ही शहरातून वाहनांना जावे लागत आहे. अरुंद रस्ता आणि बाजारपेठामधील गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे दोन्ही बाह्य वळण मार्गांची कामे नवीन ठेकेदार नेमून तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.