रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी होऊन महामार्गावर २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झालीय.
केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गिकांपैकी एका मार्गिकेवर टँकर पलटी झाल्याने ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. आय. आर. बी. यंत्रणा, बोरघाट वाहतुक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलीसांनी मदत कार्य सुरू केले आहे.
मुंबईकडे येणारी वाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात यश
या अपघातानंतर अमृतांजन ब्रिज ते आडोशी टनेलपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. असं असलं तरी रस्त्यावर पडलेल्या केमिकलवर ग्रीट, माती टाकून धीम्या गतीने मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू करण्यात यश आलं आहे.