रत्नागिरी : गूगल मॅपचा आधार घेत मुंबई – गोवा महामार्गावरून निवळी मार्गे उक्षी घाटातून जाणारा ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावल्याने ४०० फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना होता होता टळली. ही घटना सोमवारी १९ऑगस्टला सायंकाळी उशिरा घडली.
मुंबई गोवा महामार्गावरून (आर जे १४ जियो१३१५) ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. उक्षी घाटातून जाताना एका अवघड वळणावर तो फसला. यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती. मात्र येथील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी आजूबाजूची झाडी तोडून मार्ग मोकळा केला. त्यानंतर रात्री ट्रक मार्गस्थ झाला.
आणखी वाचा-सर्व विमानतळांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
मात्र पुन्हा एका वळणावर वळण घेताना खोल दरीत जाता जाता बचावला. दुसऱ्या वेळी काढल्यानंतर ही चालकाला या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि तिसऱ्या वेळी पुन्हा एका वळणामध्ये अडकला. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. येथील ग्रामस्थांनी वारंवार दिशादर्शक फलक, माहिती फलक लावण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.