सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढली असून यात मेणबत्ती मोर्च्यापासून रेल्वे रोको, जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे, एसटी बसेसवर दगडफेक आणि जाळपोळ, चक्का जाम, बंद, आमदारांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारण्यापर्यंत आक्रमकता वाढली आहे. दरम्यान, राजकीय नेते, आमदार, प्रशासनाला लक्ष्य केले जात असल्यामुळे भाजपचे माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोलापूर-पुणे लोहमार्गावर रेल्वे रोखली. यावेळी वाहनांचे टायर पेटवून लोहमार्गावर टाकण्यात आले होते.
राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलीस तेथे धावून आले. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून तेथे बराच वेळ ठिय्या आंदोलन केले. एकनाथ शिंदेचलित शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, उध्दव ठाकरेचलित शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण आदींनी हे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू असताना याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी होटगी रस्त्यावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर ‘जबाब दो’ आंदोलन केले. तीव्र निदर्शने होत असतानाच तेथे परिस्थिती चिघळू नये म्हणून सुमारे शंभर पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला.
हेही वाचा : “…तर महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजीनामे द्यावेत”; उद्धव ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे म्हणाले…
तेव्हा आमदार देशमुख हे स्वतः आंदोलकांच्या मांडीला मांडी लावून बसले. परंतु आंदोलकांनी विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खडे बोल सुनावत कडक शब्दात जाब विचारला. घरात बसण्यापेक्षा मुंबईत ठाण मांडून शासनाला मराठा आरक्षण देण्यासाठी दबाव आणा, अन्यथा आमदारकी सोडा, अशी मागणी केली. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण दिसून आले. मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढत असताना ८५ वर्षांचे वयोवृध्द कार्यकर्ते विष्णू पवार व सोमनाथ राऊत यांचे आमरण उपोषण सुरूच आहे. पवार यांची प्रकृती खूपच ढासळल्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात काही भागात एसटी बसेस जाळण्याचे आणि दगडफेकीचे प्रकार घडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सोलापूर आगारातून दररोज सुमारे ४५० एसटी बसेसची प्रवासी वाहतूक होते.
हेही वाचा : “मराठा आंदोलनाच्या आडून काही जण हिंसाचार….”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
तर अन्य जिल्ह्यांसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून मिळून दररोज सुमारे ३५०० एसटी बसेसची प्रवासी वाहतूक होते. परंतु संपूर्ण बससेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतानाच एसटी बससेवा बंद असल्यामुळे त्यांची तारांबळ होत आहे. करमाळा, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, मोहोळ आदी भागात एसटी बसेसवर दगडफेकीचे प्रकार घडले. करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मराठा आंदोलकांनी एसटी बस जाळली. तर पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव तसेच मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे एसटी बसेस जाळण्याचे प्रकार घडले. करमाळा शहरात जेलभरो आंदोलन करून मराठा समाजासह इतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली . तर मोहोळ शहरात कडकडीत ‘ बंद ‘ पाळण्यात आला. तेथील तहसील कार्यालयाला टाळेही ठोकण्यात आले.