|| भक्ती बिसुरे
शैक्षणिक पात्रता नसतानाही आहाराबाबत सल्ले; आवर घालण्यासाठी प्रशिक्षित आहारतज्ज्ञ सरसावले
एका ३२ वर्षीय महिलेने बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी समाज माध्यमातील आहारतज्ज्ञ गटांचा सल्ला घेतला. त्यातून क्रॅश डाएट करून झपाटय़ाने वजन घटवले. काही काळानंतर दुसऱ्यावेळी गर्भधारणा होताच कमी झालेले वजन दुप्पट वेगाने वाढले आणि तब्येतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाली. एका २७ वर्षीय तरुणाने आहारतज्ज्ञाची शैक्षणिक पात्रता न पाहाताच त्याने दिलेले डाएट पाळले, त्यातून एका महिन्यात १० किलो वजन कमी केले पण त्यानंतर आलेल्या अशक्तपणावर उपाय म्हणून त्याला प्रशिक्षित आहारतज्ज्ञाचा शोध घ्यावा लागला, अशा अनेकांची संख्या वाढत आहे.
सुंदर आणि सुडौल शरीर ही अनेकांच्या मनातील सुप्त इच्छा असते. ते कमावण्याच्या हव्यासाने जाहिराती आणि समाज माध्यमांतील समूहांमध्ये सल्ले देणाऱ्या आहारतज्ज्ञांच्या मागे लागून अनेक जण आपल्या शरीराचे नुकसान करून घेतात. आहारतज्ज्ञांच्या अशा सुळसुळाटाला आवर घालण्यासाठी ‘इंडियन डायटेटिक असोसिएशन’ने पुढाकार घेतला आहे. प्रशिक्षित आहारतज्ज्ञांनाच काम करण्यासाठी मान्यता मिळावी अशी मागणीही या निमित्ताने पुढे येत आहे.
‘इंडियन डायटेटिक असोसिएशन’च्या पुणे शाखेच्या अध्यक्ष अनुजा किणीकर यांनी याबाबत माहिती दिली. किणीकर म्हणाल्या, आहारतज्ज्ञांच्या संघटनेच्या देशात २४ शाखा आहेत. १४ हजार आहारतज्ज्ञ या शाखांचे सदस्य आहेत. महाराष्ट्रात २००० आहारतज्ज्ञ या संघटनेशी जोडले आहेत. आहाराची पोषणमूल्य (न्यूट्रिशन) हा विषय घेऊन पदवी आणि पदविका अभ्यास किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहारतज्ज्ञांचा या संघटनेमध्ये समावेश केला जातो. असे आहारतज्ज्ञ बायो केमिस्ट्री, मेडिकल न्यूट्रिशन थेरपी, क्लिनिकल थेरपी शिकलेले असतात. सध्या ‘व्होकेशनल कोर्स’च्या नावाखाली आलेल्या छोटय़ा कालावधीच्या प्रमाणपत्र अभ्यासांचे प्रमाण वाढत आहे. पुरेसा अनुभव नसताना आहारतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, ‘न्यूट्रिशन’ विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना विषयाचे सखोल ज्ञान असते. डॉक्टरांना वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे सक्तीचे आहे तसेच आहारतज्ज्ञांनाही आहे. त्यातून अनुभवी आहारतज्ज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळते. शनिवार, रविवारच्या, ३ महिन्यांच्या अभ्यासक्रमातून हे शिक्षण मिळत नाही. त्यातून नवखे आहारतज्ज्ञ आलेल्या व्यक्तीला ‘क्रॅश डाएट’ देतात. त्याचे वजनावर परिणाम दिसतातही. मात्र झपाटय़ाने वजन कमी झाल्याने अनेक गंभीर दुष्परिणामही पाहायला मिळतात. म्हणूनच आहारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यापूर्वी तो प्रशिक्षित आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे.
जीममधील सल्ला, खबरदारी घ्या
जीममध्ये व्यायाम करणारे तरुण तेथील आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात. मात्र जीममधील आहारतज्ज्ञांनी व्यायाम आणि आहार यांची प्राथमिक माहिती देणारे प्राथमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. त्याचे तात्पुरते परिणाम दिसत असले, तरी वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशिक्षित आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.