IAS Pooja Khedkar : प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत आहेत. यातच आता त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होताना डोळ्यांची दृष्टी कमी असल्याचा दावा केला होता. हा दावा वादात अडकण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणार्थी (प्रोबेशनरी) IAS अधिकारी पूजा खडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. खासगी वाहनावर लाल-निळा दिवा लावणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनावर कब्जा मिळवल्यामुळे त्या वादात अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. आता पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. युपीएससी परीक्षा देत असताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते.

पूजा खेडकर यांना सूट मिळाली?

युपीएससी परीक्षेत सूट मिळावी यासाठी पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचे जाणूनबुजून सांगितले का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. परीक्षेत कमी मार्क मिळूनही दिव्यांग असल्यामुळे सूट मिळाल्यानंतर पूजा खेडकर परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि त्यांचा देशभरातून ८४१ क्रमांक लागला.

IAS पूजा खेडकरांचा भलताच रुबाब; वरीष्ठ अधिकाऱ्यांचं टेबल हटवलं, ऑडीला लाल दिवा लावल्याचा ‘कार’नामा समोर

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध होण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.

२२ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पहिल्यांदा दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले गेले. मात्र त्यावेळी करोना झाल्याचे कारण देऊन त्यांनी वैद्यकीय तपासणी टाळली. त्यानंतर २६ आणि २७ मे २०२२ रोजी एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले. त्यावेळीही खेडकर अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर १ जुलै, २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वैद्यकीय तपासणीला त्यांनी दांडी मारली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नेमून दिलेल्या रुग्णालयात तपासणी न करता खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला.

IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!

मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. शारीरिक अडचणींबरोबरच पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयरबाबत केलेला दावाही खोटा असल्याचे समोर आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरताना ४० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. दिलीप खेडकर यांची संपत्ती पाहता पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. दिलीप खेडकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती.