IAS Pooja Khedkar Father Dilip Khedkar Reaction : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित अनेक वाद दिवसेंदिवस बाहेर येत आहेत. फक्त पूजा खेडकरच नाही तर त्यांच्या पालकांशी संबंधित जुनी प्रकरणेही बाहेर येत आहेत. नुकतेच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा पिस्तुल घेऊन शेतकऱ्याला धमकविणारा जूना व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिलीप खेडकर यांनी आपल्या मुलीवरील सर्व आरोप फेटाळून लावत तिची पाठराखण केली. तसेच कोणताही दोष नसताना तिला छळले जात आहे, असेही ते म्हणाले.
इंडिया टुडेशी बोलत असताना दिलीप खेडकर यांनी आपली मुलगी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरशी संबंधित प्रकरणावर भाष्य केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती मिळाली असताना जागा आणि इतर सुविधांची मागणी केल्यानंतर पूजा खेडकर चर्चेत आल्या. त्यावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले की, माझ्या मुलीने बसण्यासाठी जागा मागून कोणतीही चूक केलेली नाही.
हे वाचा >> Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल
पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी बसण्यासाठी वेगळी केबिन, हाताखाळी कर्मचारी आणि सरकारी वाहनाची मागणी केली होती. तसेच वरीष्ठ अधिकारी बाहेर गेले असताना त्यांच्या दालनावर कब्जा करत त्यांचे सर्व साहित्य दालनाबाहेर काढले होते.
माझ्या मुलीने चुकीचे काहीही केले नाही
या प्रकरणावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले, “माझ्या मुलीने चुकीचे काहीही केलेले नाही.एका महिलेने बसण्यासाठी जागा मागणे चूक आहे का? हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली आहे. त्यामुळे अंतिम निकाल काय येतो, याची आपण वाट पाहूया. याक्षणी मी एवढेच सांगू शकतो की, कुणीतरी जाणूनबुजून हा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करत आहे.”
हे ही वाचा >> Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार!
पूजा खेडकर यांच्याविरोधात कुणी द्वेषपूर्ण कारवाई करत आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया देण्यास किंवा कुणाचेही नाव घेणे टाळले.
पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र खोटे?
पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र सादर केल्याबाबतचाही प्रश्न दिलीप खेडकर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आम्ही चौकशी समितीसमोर आमचे म्हणणे मांडू. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणावर आम्ही काही बोलू शकत नाही. जे काही झाले, ते सर्व काही नियमानुसार झाले असून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही.