IAS Pooja Khedkar : पुण्यातील प्रोबेशनरी (प्रशिक्षणार्थी) सनदी अधिकारी पूजा खेडकर या सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यांची नुकतीच पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळेच त्यांना वाशिमला जावं लागलं आहे. त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली झाली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करुन स्वतःसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई यासंबंधीची मागणी वारंवार करणे. परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी त्यांच्या मागण्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीच्या गोष्टी राज्यभरात चघळल्या जात असतानाच त्यांचा आणखी एक प्रताम समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुण्यात वास्तव्यास असताना पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड (चालान) ठोठावण्यात आले आहेत. पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांच्या खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासांत निष्पन्न झालं आहे. या कारवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २१ तक्रारींची नोंद आहे. तसेच या कारवर २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो अद्याप वसूल केलेला नाही. कारण पुणे पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

हे ही वाचा >> Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

पूजा खेडकरांचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

पूजा खेडकर प्रोबेशन कालावधीत असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहात होत्या. त्यांच्या थाटाच्या सुरस कथा एकामागोमाग एक समोर येऊ लागल्या आहेत. तसेच त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप चॅटदेखील समोर आलं आहे. शासकीय नियमानुसार कोणताही सनदी अधिकारी त्याच्या खासगी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावू शकत नाही. मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावलं होतं. त्याचबरोबर खासगी कारला लाल आणि निळा दिवाही लावू नये असा नियम आहे. मात्र खेडकर यांनी हा दिवा त्यांच्या ऑडी कारला लावला होता. आलिशान खासगी कारला लाल-निळा दिवा लावून येणाऱ्या या अधिकारी कोण? अशी चर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होत होती.

हे ही वाचा >> IAS Pooja Khedkar Property : पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, सोन्याचे घड्याळ

“पूजा खेडकरांनी वरिष्ठांच्या अनुपस्थितीत त्यांच चेंबर बळकावलं”

पूजा खेडकर यांचे वरिष्ठ अधिकारी मुंबईला गेल्यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांच्या वरिष्ठाचं चेंबर बळकावलं. त्या चेंबरबाहेर, टेबलावर स्वतःच्या नावाची पाटी लावली होती. तसेच वरिष्ठांच्या अनुपस्थित त्यांच्या चेंबरमधील त्यांचं सर्व साहित्य बाहेर काढलं होतं आणि तिथे स्वतःचं सामान ठेवलं होतं. या वर्तनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांकडे याबाबत तक्रार केली होती. यासह पूजा खेडकर यांनी वरिष्ठांकडे अनेक हट्ट केले होते. अमूक कार हवी, कार्यालयाबाहेर शिपाई हवा, माझं कार्यालय अमुक ठिकाणीच हवं, अशा मागण्या केल्या होत्या. यासह खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धमक्या देत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trainee ias pooja khedkar audi car has 21 pending challans worth rs 26000 asc
Show comments