परभणी : पतीच्या निधनानंतर कोसळलेला दु:खाचा डोंगर, मुला- बाळांचे संगोपन- शिक्षणाची अचानक येऊन पडलेली जबाबदारी.. अशा संकटात खचलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास पेरण्याचे काम येथे सुरू असून विधवा, निराधार, परित्यक्ता महिलांना शिवणयंत्राचे प्रशिक्षण देऊन त्यांना आधार देण्याचा संकल्प सध्या तडीस नेला जात आहे.
माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा, परित्यक्ता स्वावलंबन संकल्प योजनेच्या माध्यमातून दोन प्रशिक्षण केंद्रावर हा उपक्रम सध्या सुरू आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व परभणी महिला स्वावलंबन बचत गट नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठाच्या एका इमारतीत हे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे तर दुसरे प्रशिक्षण केंद्र जिंतूर रोडवरील कमलताई जामकर महिला महाविद्यालयात आहे. कृषी विद्यापीठातील प्रशिक्षण केंद्रात ग्रामीण भागातील महिला आहेत तर कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील प्रशिक्षण केंद्रात शहरातील महिला शिवणकामाचे धडे घेत आहेत. दोन्ही प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत तीन तुकडय़ा बाहेर पडल्या असून आता चौथी तुकडी प्रशिक्षण घेत आहे.
परभणी तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्यात आली. यातल्या अनेक महिलांना घर ते शेत याशिवाय काहीच माहीत नव्हते. अशा महिलांना एकत्रित करण्यात आले. प्रशिक्षणाच्या निमित्ताने त्या एकत्र आल्या. त्यांनी एकमेकीजवळ आपले मन मोकळे केले. यातूनच त्यांना एक विश्वास आला. आपण खडतर परिस्थितीत हताश न होता जिद्दीच्या बळावर उभे राहिले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. या प्रशिक्षण केंद्रात आल्यानंतर शिवणयंत्र अजिबात न हाताळलेल्या महिलाही आठ दिवसात हे यंत्र हाताळू लागल्या. ज्यांना पायंडलही मारता येत नव्हते, अशा महिलांनी ब्लाऊज, फ्रॉक शिवले आहेत, अशी माहिती प्रशिक्षिका संगीता जिजाबापू चट्टे यांनी दिली.
जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा अडचणीत कोणीच मदतीला येत नाही. नातेवाईकही पाठ फिरवतात. अशावेळी कोणापुढेही हात न पसरता जगण्याचा मार्ग आम्हाला या प्रशिक्षणाच्या निमित्ताने गवसला अशी भावना मीरा विठ्ठल निर्वळ यांनी व्यक्त केली. आता मी चांगले ब्लाऊज शिवू शकते असे त्या म्हणाल्या.
वाडी दमई या गावच्या अनिता माधव ससे यांनीही या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आता स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळवल्याचे सांगितले. येथे आल्यानंतर शिवणकाम तर शिकलेच पण आता भीती वाटत नाही, असे वर्षां वीरमले यांनी सांगितले.
शहरातील बाल विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून देण्याचे काम या महिलांना दिले जाईल असे आश्वासन संस्थेचे डॉ. विवेक नावंदर यांनी दिले आहे. तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे गणवेश तयार करण्याचे कामही या महिलांना दिले जावे यासाठी आपण जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोललो आहोत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
स्वाभिमानाने जगण्याची संधी
निराधार, विधवा, परित्यक्ता यांच्यावर आघात कोसळल्यानंतर त्यांच्यासमोर जगण्याचे संकट कठीण असते. अशावेळी त्यांना आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे असते. शिवणयंत्राच्या माध्यमातून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रशिक्षित महिलांना पाच हजार शिवण यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
– आमदार डॉ. राहुल पाटील.