सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अचानकपणे झालेली बदली म्हणजे संपूर्ण सोलापूर शहराच्या विकासाला खीळ घालण्याचा काँग्रेस आघाडीचा अट्टाहास असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे व आमदार दिलीप माने यांच्या दबावाला बळी पडूनच शासनाने गुडेवार यांची बदली केली आहे. या पापाचे धनी सुशीलकुमार शिंदे हेच आहेत, असा आरोप करीत, गुडेवार यांची बदली तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या गुरूवारी, २६ जून रोजी ‘सोलापूर बंद’ पाळण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्षांनी घेतला आहे.
माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, भाजपचे आमदार विजय देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आदींनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत, सकाळी सात ते सायंकाळी चापर्यंत ‘सोलापूर बंद’चा निर्णय जाहीर करून या बंदमध्ये समस्त सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बंद काळात शहराच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
आयुक्त गुडेवार यांना महापालिकेत रूजू होऊन एक वर्षही उलटत नाही, तोच राजकीय हितसंबंधासाठी त्यांच्या बदलीचा डाव साधण्यात आला. गुडेवार यांनी सोलापूरच्या चौफेर विकासासाठी पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत अथकपणे राबून कामांचा धडाका लावला होता. पारदर्शक व स्वच्छ प्रशासन चालविताना त्यांनी महापालिकेतील ‘अलीबाबा आणि चाळीस चोरांचे’ राज्य संपविले      होते. त्याचाच राग सत्ताधाऱ्यांना होता. त्यामुळेच गुडेवार यांची बदली करण्यात आल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाचे खापर आयुक्त गुडेवार यांच्यावर फोडणे व त्यांची बदली करणे चुकीचे आहे.
या वेळी बोलताना आमदार विजय देशमुख यांनी, आयुक्त गुडेवार यांच्या पाठीशी समस्त सोलापूरकर उभे असून त्याचा प्रत्यय येत्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. गुडेवार यांची अन्यायाने बदली केल्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावेच लागतील, असा इशारा दिला. सत्ताधाऱ्यांनी गुडेवार यांच्यासारख्या एका चांगल्या, कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण केले आहे. सत्ताधाऱ्यांचा घडा भरत आला आहे, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी केला. विद्यमान शासनाने गुडेवार यांची बदली रद्द न केल्यास आगामी विधानसभा निवडणकीत राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असून त्या वेळी गुडेवार यांना पुन्हा सोलापूर महानगरपालिकेत आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपचे शहर सरचिटणीस प्रा. अशोक निंबर्गी यांनी व्यक्त केला.

Story img Loader