सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला वेसण घालून शहराचा विकास साधणारे आणि अवघ्या सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याचे वृत्त असून त्यांना ग्रामविकास विभागात पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या बदलीचा आदेश मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तथापि, गुडेवार यांच्या बदलीचे वृत्त येताच महापालिकेत विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन हाती घेतले आहे.
सोलापूर महापालिकेत गुडेवार हे गेल्या वर्षी ४ जुलै २०१३ रोजी रुजू झाले होते. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीला एक वर्षही पूर्ण होत नाही तोच, केवळ अकरा महिन्यांत महापालिकेतील राजकीय हितसंबंध दुखावलेल्या सत्ताधारी मंडळींनी गुडेवार यांना माघारी पाठविण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून अखेर गुडेवार यांच्या बदलीचा घाट घातला गेल्याचे उघडपणे बोलले जात आहे. गुडेवार यांनी वर्षांच्या आत आपली बदली होणार, हे गृहीत धरून महापालिकेतील कारभार चांगलाच गतिमान करून तीन वर्षांतील कामे अवघ्या एका वर्षांत करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. यापूर्वी दोन-तीन वेळा त्यांच्या बदलीसाठी सत्ताधाऱ्यांनी कट कारस्थान रचले होते. त्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न झाला. गेल्या महिन्यात पाणीप्रश्नाची ढाल पुढे करून सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत त्यांचा अवमान केला होता. त्यामुळे वैतागून गुडेवार यांनी थेट बदलीचा अर्ज शासनाकडे पाठवून निघून जाणे पसंत केले असता त्या वेळी अवघे सोलापूरकर गुडेवार यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते. नंतर त्यांचे स्वागतही चक्क गुढी उभारून करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांची बदलीचा घाट घातला गेल्याचे कळताच शिवसेना-भाजप युतीसह बसपा, माकप आदी राजकीय पक्षांसह अन्य सामाजिक संघटनांनी आंदोलन हाती घेतले आहे. गुडेवार यांची बदली रद्द होण्यासाठी बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर ते मंत्रालय पायी चालत मोर्चा नेण्याचा इशारा दिला. बसपाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले. तर शिवसैनिकांनीही पालिका आवारात ठिय्या आंदोलन केले. भाजपनेही सायंकाळी आंदोलन केले. तर सोलपूर सामाजिक संस्था, सोलापूर युवक प्रतिष्ठान, श्रीमंत राजे प्रतिष्ठान आदी संघटनांनी गुडेवार यांच्या बदलीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचे मुख्यालय असलेल्या काँग्रेस भवनासमोर ‘होम हवन’ करून अनोखे आंदोलन केले. माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी गुडेवार यांच्या बदलीला विरोध करून या प्रश्नावर सर्वपक्षीय आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
गुडेवार यांनी पालिकेत आल्यानंतर प्रथम प्रशासनाला शिस्त लावली. दोन डझनांपेक्षा अधिक भ्रष्ट, कामचुकार व मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी घरी पाठविले आहे. केंद्राच्या योजनेतून त्यांनी तब्बल दोनशे शहरी बसेस मंजूर करून आणल्या असून याशिवाय शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भीमा नदीच्या टाकळी बंधाऱ्यावरून समांतर जलवाहिनी योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून १६७ कोटींचा निधीही मंजूर करून आणला आहे. शहरात अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या मलनि:सारण योजनेच्या २१२ कोटी खर्चाच्या कामाला विलंब लावणाऱ्या ठेकेदाराला वठणीवर आणताना नव्याने निविदा मागविण्याचे कामही गुडेवार यांना करावे लागले. मोठय़ा प्रमाणात थकलेली एलबीटी वसुलीच्या माध्यमातून महापालिकेला आर्थिक ऊर्जितावस्था प्राप्त करून देताना गुडेवार यांनी संपूर्ण शहर डिजिटल फलकमुक्त केले असून बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे व वाहनतळांच्या जागांचा वापर वाणिज्य हेतूसाठी करणाऱ्या मिळकतदारांविरुद्ध कारवाई करताना गुडेवार यांनी कोणताही मुलाहिजा ठेवला नाही. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करताना ड्रेस कोड सुरू केला. कर्मचाऱ्यांमध्ये आत्मसन्मान मिळवून देताना ४०  टक्क्य़ांपर्यंत वेतनवाढ करणारे गुडेवार हे कर्मचाऱ्यांचेही ताईत बनले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा