नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याने पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धडगावच्या खडक्या येथे १ ऑगस्टला महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला होता. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने न्यायाच्या मागणीसाठी वडिलांनी मृतदेह दीड महिना मीठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला. हे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवून कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुन्हा शवविच्छेदनासाठी मृतदेह गुरुवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आणला. शवविच्छेदनाचा अहवाल प्रलंबित आहे. अखेर दीड महिन्यानंतर कुटुंबीयांनी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.

 या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. अखेर धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांचा कार्यभार आय. एन. पठाण यांनी स्वीकारला आहे. याशिवाय उपनिरीक्षक बी. के. महाजन यांचीही नियंत्रण कक्षात आणि खडक्या, वावी क्षेत्र सांभाळणारे संजय मनोरे, किरण वळवी, उदेसिंग ठाकरे, योगेश निकम या पोलीस कर्मचाऱ्यांची इतर पोलीस ठाण्यांत बदली करण्यात आली आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबईहून खडक्या येथे परतलेल्या पीडितेच्या वडिलांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केले. दोषींना कठोर शिक्षा करून मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी रविवारी केली. तत्पूर्वी, शनिवारी या प्रकरणाच्या वेगवान तपासासाठी पोलीस महानिरीक्षकांनी नेमलेल्या विशेष तपास पथकाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली.