पुण्याच्या कृषी विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांची बदली करण्यात आली आहे. सुनील केंद्रेकर यांना आता पुणे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. पुण्याच्या कृषी विभागाच्या आयुक्तपदी प्रताप सिंह यांची वर्णी लागली आहे. प्रताप सिंह याआधी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी राजेश देशमुख यांची वर्णी लागली आहे. राजेश देशमुख यांच्याकडे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी पद होते. निधी चौधरी यांची नियुक्ती मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून करण्यात आली आहे. निधी चौधरी यांच्याकडे आधी पालघरचे मुख्याधिकारीपद होते.
एम. एन बोरीकर हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव होते. मात्र त्यांची बदली झाली असून, त्यांना आता पालघरचे मुख्याधिकारीपद देण्यात आले आहे. तर मुख्यमंत्र्याचे उपसचिव के.बी. शिंदे यांचीही बदली झाली असून त्यांच्याकडे आता साताऱ्याच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या सहाही अधिकाऱ्यांपैकी सुनील केंद्रेकर यांचा लौकिक हा दबंग सनदी अधिकारी म्हणून होता. बीडमध्ये नियुक्त झाल्यावर केंद्रेकर यांनी माजलगाव महामार्गावरची अतिक्रमणे हटवली. स्त्री भ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई केली आहे. चारा छावण्या शासकीय नियमांनुसार चालवण्यावर भर दिला होता.