लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : राज्याच्या सीमेवर परिवहन विभागाचे तपासणी नाके बंद करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने स्वागत केले. अनेक वर्षापासून सुरू असलेला लढा यशस्वी झाल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

जीएसटी कायदा देशभर लागू झाल्यानंतर माल व प्रवासी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे राज्य सीमा तपासणी नाके त्वरित हटवावेत, असे निर्देश केंद्र सरकारने वारंवार राज्य सरकारला दिलेले होते. देशातील १८ राज्यांमध्ये यापूर्वीच असे परिवहन विभागाचे तपासणी नाके हटवण्यात आलेले आहेत. मात्र, महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगडमध्ये अद्यापही ते सुरू ठेवण्यात आले होते.

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली या देशव्यापी वाहतूक संघटनेचे बल मलकितसिंग, अमृतलाल मदन, प्रकाश गवळी, बाळासाहेब कलशेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन विभागाचे सीमा तपासणी नाके बंद करण्यासंदर्भात राज्य सरकार बरोबर वाटाघाटी, पत्रव्यवहार चर्चा, पाठपुरावा सतत चालू ठेवलेला होता. या प्रयत्नाला यश आले असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने राज्य सीमेवरील तपासणी नाके बंद करण्यात आले.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत सांगलीत पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारी संचालक श्री. कलशेट्टी, विशेष निमंत्रित जयंत सावंत, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, उपाध्यक्ष महेश पाटील, भाग्येश शहा, उपसचिव नागेश म्हारगुडे, संचालक सुहास पाटील, रितेश रावळ, रोहित सावळे, आशिष सावळे, नीलेश गोरे, संदीप तांबडे, माजी उपाध्यक्ष राजशेखर सावळे, मेकॅनिकल असोसिएशनचे पदाधिकारी, ट्रकमालक चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Story img Loader