Pratap Sarnaik on Finance Department : एसटी महामंडाळा यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मार महिन्याचा केवळ ५६ टक्केच वेतन मिळणार आहे. त्याबाबतची सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना देण्यात आली. पूर्ण वेतन मिळणार नसल्याने कामगार संघाटना संतापल्या आहेत. यावरून आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम दिली जाते. प्रत्येक महिन्यात मागणीप्रमाणे निधी मिळत नाही. त्यामुळे तूट वाढून पी. एफ. ग्रॅज्युअटी, बँक कर्ज, एल.आय.सी अशी साधारण २३ हजार ५०० कोटी रुपयांची देणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊनसुद्धा महामंडाळाकडून संबंधित संस्थांकडे वर्ग केली गेली नाहीत. तर, मार्च महिन्याचा पगारही आता निम्माच मिळणार आहे. याचं खापर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्यावर फोडलं आहे. अर्थखात्याकडून प्रतिपूर्तीचा निधी मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अर्थखात्याकडून पैसे वेळेवर मिळत नाहीत
प्रताप सरनाईक म्हणाले, ” एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. परंतु, अर्ध्या तिकिटाचे पैसे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात. ते पैसे वेळेवर मिळाले पाहिजे. अर्थखात्याकडून आम्हाला कधीकधी वेळेवर पैसे मिळत नाहीत. अर्थखात्याचे प्रमुख अजित पवारांना विनंती केली आहे की अर्थखात्याकडून आम्हाला योग्य सहकार्य मिळालं पाहिजे.”
मार्च महिन्याचा ५६ टक्केच निधी मिळणार
यंदा महामंडळाने शासनाकडे मार्च महिन्याच्या वेतनासह इतर थकीत देण्यांसाठी ९२५ कोटींच्या निधीची मागणी केली होती. परंतु, २७२ कोटी ९६ लाख रुपये मिळाले. त्यातील ४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी महामंडळाने एसटी बँकेकडे वर्ग केले. त्यामुळे ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापैकी केवळ ५६ टक्केच निधी दिला जाणार आहे. शिल्लक वेतनाबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे एसटी अधिकारी सांगत आहेत.