सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर महामार्ग राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ आणि टोल अथॉरिटी व महामार्ग पोलिसांमुळेच अनेक अपघात होत आहेत. अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. अपघाताला जबाबदार असणाऱ्या यंत्रणांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केला.
रविवारी साताऱ्यात पुणे-बंगळूर महामार्गावर पाचवड (ता. वाई) गावाच्या हद्दीत अपघात झाला. रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने मोटारीतील दोन महिलांचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यामागे महामार्गावरील टोल अथोरिटी व महामार्ग पोलीस यांच्या निष्काळजीपणामुळेच हे अपघात झाल्याचे गवळी यांनी म्हटले आहे.
महामार्गावर रस्ते विकास महामंडळ टोल अथॉरिटी व महामार्ग पोलिसांचे वेळोवेळी पेट्रोलिंग केले जात नाही. अवजड वाहन, मालट्रक अथवा छोट्या मोठ्या मोटारी रस्त्यावर बंद पडल्या असता रस्त्याची सुरक्षा असणाऱ्या या यंत्रणांनी क्रेनच्या माध्यमातून बंद पडलेल्या अशा गाड्या बाजूला घ्यायला हव्यात. अशा गाड्या कित्येक तास महामार्गावर उभ्या असतात. मात्र, असे होताना दिसत नाही. वेळोवेळी महामार्ग पोलीस व टोल अथोरिटीच्या कर्मचाऱ्यांची महामार्गावर गस्त दिसत नाही.
बंद पडलेल्या गाड्या लवकर हलविल्या जात नाहीत. या प्रकारच्या अपघातांमुळे नाहक अपघात होत आहेत. यामुळे अनेकदा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. महामार्ग यंत्रणांकडे महामार्गावरील गाड्या हलवण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यासाठी त्यांना निधीही उपलब्ध आहे. यापुढे असे अपघात घडल्यास या यंत्रणांवर गुन्हा दाखल करायला हवा, असे प्रकाश गवळी यांनी सांगितले.